महापालिका प्रशासनाकडून दखल ः पुनर्तपासणी, फेरमूल्यांकनाचे आदेश
प्रतिनिधी / कोल्हापूर
घरफाळा आकारणी संदर्भातील अनियमिततेबाबत सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. ज्या मिळकतींबाबत तक्रारी आहेत. त्यांची पुर्नतपासणी आणि फेरमूल्यांकन करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना देण्यात आले आहे.
महापालिकेतील बहुचर्चित घरफाळा घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी घरफाळा घोटाळ्या संदर्भातील माहिती उघडकीस आणली होती. त्यामध्ये तत्कालिन कर निर्धारक व संग्राहकांसह अधिकारी व कर्मचाऱयांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी करण्यात आली होती. सध्या घरफाळा घोटाळा प्रकरणाची चौकशी सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांच्याकडून सुरू आहेत. शहरातील ज्या मिळकतींना घरफाळा लागू नाही अथवा घरफाळा लागू आहे पण तो योग्य पद्धतीने लागू नाही, चुकीची असेसमेंट करण्यात आली आहे, अशा अनेक मिळकतींची चौकशी करण्यात येत आहे.
त्याचा अहवालही लवकरच येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील काही मिळकतींबाबत सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत, त्या व्यक्ती राजकारणाशी संबंधित असल्याने त्यांच्या आरोप-प्रत्यारोपांची चर्चाही रंगली आहे. एका राजकीय पक्षाने तर आरोप-प्रत्यारोपांचा धागा पकडत घरफाळा विभागाच्या स्वतंत्र ऑडीटची मागणी केली आहे.
पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासकानाकडून कोणती कार्यवाही होणार या बद्दलही शहरात उत्सुकता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका प्रशासनाने आरोप-प्रत्यारोपाची दखल घेतली आहे. ज्या मिळकतींबाबत तक्रारी आहेत, त्यांची शहानिशा करण्यात येत आहे. त्याचबरोबर संबंधित मिळकतींची पुनर्तपासणी करण्याचे तसेच प्रसंगी फेरमूल्यांकन करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना देण्यात आले आहे. घरफाळा आकारणी करण्याआधी मिळकतींच्या संबंधांना ज्या ठिकाणी नोंदी, नोंदणी केली जाते, त्या कार्यालयांकडूनही माहिती मागविण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने अधिकाऱयांना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.









