आणखी 50 ठरावधारक बाधित
प्रतिनिधी / कोल्हापूर
डोणोली (ता. शाहूवाडी) येथील गोकुळ दूध संघाचे ठरावधाकर सुभाष पाटील (वय वर्षे 54) यांचा शनिवारी कोरोनाने बळी घेतला. कोल्हापुरातील एका खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सदाशिव पाटील दूध संस्थेचा ठराव त्यांचे नावे होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठरावधारक कोरोनाने दगावल्याने गोकुळ वर्तुळात खळबळ उडली आहे. यापूर्वी निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ कर्मचारी बाधित झाला होता. दरम्यान जिल्ह्यातील अजून 40 ते 50 ठरावधाकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजते. यामध्ये अर्ज दाखल केलेल्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी ठरावधारकांचे मेळावे, बैठका सुरु आहेत. सत्ताधारी, विरोधी गटाकडून या बैठका घेतल्या जात आहेत. प्रमुख नेते, मान्यवर, इच्छूक उमेदवार बैठकांना हजेरी लावत आहेत. आठ दिवसापूर्वी गारगोटी येथे विरोधी आघाडीचा मेळावा झाला होता. या मेळाव्यानंतर एका नेत्यासह आठ ते दहा ठरावधारक पॉझीटीव्हा आले होते. त्यापाठोपाठ सध्या शिरोळ, हातकणंगले, येथेही ठरावधारक पॉझीटीव्ह असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यातच शनिवारी सुभाष पाटील या ठरावधारकाच्या मुर्त्यूने खळबळ उडाली आहे.









