निवडणूक स्थगितीबाबत उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका, निवडणुकीचा मार्ग झाला मोकळा
न्यायालयीन लढ्यात सत्ताधारी ठरले अपयशी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहेत. इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकाही स्थगित केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर `गोकुळ’ची निवडणूकही पुढे ढकलावी,अशी याचिका सत्तारुढ गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. पण सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेऊन पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागितली होती. पण शुक्रवारी सत्तारुढ गटाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयीन वादाचा मुद्दा निकाली निघाल्यामुळे आता गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती असताना केवळ गोकुळ दुध संघाची निवडणूक कशासाठी ? अशी भूमिका घेत गोकुळच्या सत्तारुढ गटाने उच्च न्यायालयात याचिक दाखल केली होती. पण हा निर्णय राज्यसरकारच्या पातळीवर घेण्याचे सुचित करून उच्च न्यायालयाने हा दावा निकाली काढला. त्यानंतर 12 मार्चला सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली.
पण गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी कार्यरत ठेवून सार्वजनिक कार्यक्रमांवरही निर्बंध लादण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णसंख्या वाढीचा हा धागा पकडून सत्तारुढ गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण तेथे सुनावणीसाठी विलंब होत असल्यामुळे सदर याचिका मागे घेऊन काही दिवसांपूर्वी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण ही याचिका देखील फेटाळल्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसारच निवडणूक होणार आहे.
| न्यायालयीन लढ्यात सत्ताधारी अपयशी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोकुळची निवडणूक स्थगित करावी या मागणीसाठी सत्ताधारी गटाने दाखल केलेली याचिका शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच झालेल्या न्यायालयीन लढाईत सत्ताधारी अपयशी ठरले असून विरोधकांना अप्रत्यक्षपणे बळ मिळाले आहे. |









