दोन वेगवेगळया बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / गडहिंग्लज
अनलॉक असताना ही गडहिंग्लज तालुक्यात झपाटयाने कोरोनाची रूग्ण संख्या वाढत असल्याने दि. 7 ते 16 सप्टेंबर अखेर दहा दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय वेगवेगळया दोन बैठकीत घेण्यात आला. पंचायत समितीच्या सभागृहात सभापती रूपाली कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील विविध पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. तर नगरपालिकेच्या शाहू सभागृहात नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यापाऱयांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीत अमर चव्हाण, हारूण सय्यद, शिवप्रसाद तेली, नागेश चौगुले, राजेंद्र तारळे, रियाजभाई शमनजी, उदयराव जोशी, विद्याधर गुरबे, बाळेश नाईक, दिलीपराव माने, वसंतराव यमगेकर, सिध्दार्थ बन्ने आदीनी मनोगत व्यक्त केली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बंद हाच उपाय असून गरज ओळखून 7 ते 16 सप्टेंबर असा दहा दिवसाचा तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला उपसभापती श्रिया कोणकेरी, बनश्री चौगुले, रामाप्पा करिगार, जयश्री तेली, विजयराव पाटील, मारूती राक्षे, संदीप नाथबुवा, जयकुमार मन्नोळी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
नगरपालिकेच्या शाहू सभागृहात झालेल्या व्यापाऱयांच्या बैठकीत योगेश शहा, देवदत्त देशपांडे, दीपक कोळकी, प्रकाश मोरे, रामदास कुराडे, महेश शहा, भैरू गंधवाले, मंच्छिद्र ताशिलदार, रवि घेज्जी, श्रीनिवास वेर्णेकर, नितीन देसाई, सागर कुराडे यांनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आपला निर्णय जाहीर करताना तालुक्याप्रमाणे 7 ते 16 सप्टेंबर असा दहा दिवसासाठी जनता कर्फ्यु राहणार आहे. वैद्यकीय, दूध, बँका, पतसंस्था, शासकीय कार्यालय वगळता अन्य सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी या कर्फ्यूला पाठिंबा देण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी दहा दिवस घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले. उपनगराध्यक्षा शंकुतला हातरेटे, राजेश बोरगावे, महेश कोरी, क्रांतीदेवी शिवणे, सुनिता पाटील, उदय कदम यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती आणि नगरपरिषदेत उपस्थित असणाऱया प्रमूख पदाधिकाऱयांनी दहा दिवस जनता कर्फ्युच्या निर्णयांची माहिती प्रांताधिकारी, तहसिलदार यांना लिखीत स्वरूपात दिली आहे. आता दहा दिवसाच्या जनता कर्फ्युला तालुक्यातील जनतेचा कसा प्रतिसाद मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
मंत्री, आमदारांचा पाठिंबा
गडहिंग्लज तालुक्यातील कोरोना फैलाव रोखण्यासाठी सर्वपक्षीय मंडळीनी दहा दिवसाचा बंदचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रशासनाची मदत मिळावी याबाबत सुचना करावी. यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश पाटील यांना बैठकीतून मोबाईलवर संपर्क साधला. बैठकीची माहिती देत निर्णय सांगितल्यावर जनता कर्फ्युला या दोन्ही नेत्यांनी पाठिंबा असल्याचे सांगत प्रशासनला सुचना देत असल्याचे आश्वासन दिले.









