प्रतिनिधी / गगनबावडा
गगनबावडा तालुक्यात काल आणखी चार जणांचा अहवाल कोरोणा पॉझिटिव्ह आला आहे.तहसिलदार संगमेश कोडे यांचाही त्यात समावेश असल्याने गगनबावडा तालुक्याची चिंता वाढली आहे.
गगनबावडा तालुक्याचे तहसिलदार संगमेश कोडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी महसूल आरोग्य, पोलिस, वनविभाग इत्यादी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. पण यावेळी तहसिलदार कोरोनाग्रस्त ठरल्याने भिती वाढली आहे. त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्याना कॉरंटाईन केले आहे. सैतवडेपैकी बुवाचीवाडी येथील एका वृद्धाचा कोरोनाने गुरुवारी मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कातील दोघांचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला. एकास गगनबावडा कोरोना सेंटरमध्ये तर लहान बाळास होमक्वारंटाईन केले आहे. मणदूर येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिला गगनबावडा येथील कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
आज अखेर तालुक्यात ८१ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. ५८ जण कोरोणावर मात करुन घरी परतले आहेत. सद्या २१ जण ऍक्टिव्ह कोरोणाग्रस्त आहेत २ मयत झाले आहेत. दरम्यान दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने तालुक्यात भिती वाढली आहे.