वार्ताहर / धामोड
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील खामकरवाडी येथील लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून डाव्या तीरावरील कालव्यातून पाणी ओसंडून वहात आहे. एवढया लवकर ‘ओव्हर फ्लो’ होणारा राधानगरी तालुक्यातील कदाचित हा पहिलाच प्रकल्प म्हणावा लागेल.
खामकरवाडी-आवचितवाडी दरम्यानच्या ओढयावर ६९० दलघमी पाणी साठवण क्षमतेचा लघुपाटबंधारे प्रकल्प सन २००२ साली बांधण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे खामकरवाडी, अवचितवाडी, कुरणेवाडी कोते, चांदे गोतेवाडी आदी गावांना कमी-अधिक प्रमाणात शेतीसाठी फायदा झाला आहे तर २५o हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
ऐन उन्हाळ्यात नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच हा प्रकल्प रिकामा होतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या आठवड्यात परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला. आज अखेर प्रकल्प परिसरात ९५३ मि. मि. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अंतर्गत उगाळामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने उर्वरित पाणी डाव्या तीरावरील सांडव्यावरुन ओसंडून वाहत आहे. सांडव्यावरुन पडणारे पाणी लोंढा नाल्यात तर तेथून पुढे तुळशी नदीपात्रात प्रवाहित होत आहे. त्यामुळे लोंढानाला व तुळशी नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
गतसाली ८ जुलैला भरलेला हा प्रकल्प यंदा याच महिन्यात १२ जुलैला ‘ओव्हर फ्लो’ झाला.








