मास्क न वापरल्याचा गुन्हा दाखल
प्रतिनिधी / वारणानगर
राक्षी ता. पन्हाळा येथे असलेल्या एकलव्य कोरोना केंद्रात अलगीकरण कक्षात ठेवलेल्या कोरोनाबाधितांनी आवारातच विनामास्क फुटबॉलचा डाव मांडलेल्या सहा जणांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद एकलव्य कोव्हिड केअर सेंटरचे समन्वय अधिकारी प्रविण अशोक राव यानी दिली आहे.
एकलव्य कोव्हिड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे स्वॅब तपासणीस घेतले जातात तसेच बाधीत रूग्णावर तिथे उपचार देखील केले जातात. या केंद्रात सद्या ५९ स्त्री आणि पुरुष यांना अलगीकरण कक्षात उपचारास ठेवले आहे. शनिवार दि.२५ रोजी दुपारी ४ वाजता या कक्षात कोरोनाबाधित असलेले पोर्ले व कोलोली येथील सात जण एकत्र येवून अलगीकरण कक्षाच्या व्हरांड्यात पोर्ले विरूध्द कोतोली असे गट पाडून फुटबॉलने खेळत होते.
कोरोना केअर सेंटरमध्ये फुटबॉल खेळ खेळल्याचा अहवाल कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यानी आज सोमवार दि. २७ रोजी समन्वय अधिकारी प्रविण राव यांना दिल्यावर त्यांनी या सात जणांविरूध्द कोडोली पोलीसात फिर्याद नोंदवली आहे.
कोरोना केंद्रात फुटबॉल खेळण्यास बॉल कसा उपलब्ध झाला तसेच हा खेळ खेळणाऱ्यामध्ये पोर्ले येथील दोन व कोतोली येथील चार अशा सहा बाधित रूग्णांनी समूहाने एकत्र येणे, तोंडाला कापड अथवा मास्क न वापरणे यासह जिल्ह्यात कोरोनाच्या संदर्भाने लागू केलेल्या विविध नियमाचे उल्लंघन केलेबाबतच्या अनुषंगाने भा.द.वि. च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास हावलदार भैरू माने करीत आहेत.