प्रतिनिधी / कोल्हापूर
संपूर्ण जगाला ग्रासलेल्याकोरोना या विषाणूला निक्रिय करू शकणारे महत्त्वपूर्ण संशोधन येथील शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोफॅब्रिक्स सेंटरच्या संशोधकांनी केले आहे. येथे संशोधित करण्यात आलेल्या ‘व्हायरस कवच’ या फॅब्रिक स्प्रे (कपडय़ांवर मारावयाचा फवारा) तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरससह अन्य अनेक घातक विषाणूंना निक्रिय करणे शक्य होणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज येथे दिली.
विद्यापीठात आज सकाळी नॅनोसायन्स व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. किरणकुमार शर्मा या संशोधकांसह या उत्पादनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱया पुणे येथील इकोसायन्स इनोव्हेशन प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत म्हेतर, संचालक अजय म्हेतर यांनी कुलगुरू डॉ. करमळकर व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना भेटून या अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन व उत्पादनाबद्दल माहिती दिली. ‘व्हायरस कवच’ तंत्रज्ञानाच्या प्रभावाने कोविड-19 विषाणू 99.99 टक्क्यांपेक्षाही अधिक निक्रिय झाल्याचे आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये आढळल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ नॅनोफॅब्रिक्सचे प्रा. किरणकुमार शर्मा यांनी प्रा. पी.एस. पाटील आणि डॉ. किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भातील संशोधन केले आहे. ‘व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे’ हा लवकरच सर्व महत्त्वाच्या औषध दुकानांमधून सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. याची किंमत 250 मि.ली. बाटलीसाठी रु. 270 तर 500 मि.ली. साठी रु. 495 इतकी असणार आहे.
काय आहे संशोधन?
‘व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे फक्त आपल्या कपडय़ांवर फवारायचा आहे. वाळल्यानंतर पुढे तो कपडे धुवून टाकेपर्यंत आपल्याभोवती संरक्षक कवचाप्रमाणे ते काम करते. कपडे धुतल्यानंतर पुन्हा त्यावर हे फवारले की झाले. यामध्ये केवळ सेंद्रिय कार्बोक्झिलिक ऍसिडची संयुगे आहेत.
काय आढळले चाचण्यांत?
देशासह जगातील आघाडीच्या प्रयोगशाळांत या व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रेची चाचणी घेण्यात आली. याचे अँटिमायक्रोबायल गुणधर्म तपासण्यासाठी व्हायरस कवच फवारलेल्या कपडय़ाच्या पृष्ठभागावर ग्राम-पॉझिटिव्ह प्रकारांतील (स्टॅफिलोकोकस ऑरेयस) आणि ग्राम-निगेटिव्ह प्रकारांतील (इशेरिषिया कोलाय) जीवाणूंचा सुमारे 15 मिनिटे संपर्क आला असता ती 99.99 टक्क्यांहूनही अधिक निक्रिय झाल्याचे दिसले. त्याचप्रमाणे या स्प्रेच्या अँटिव्हायरल गुणधर्मांची तपासणी अमेरिकेतील बायोसेफ्टी लेव्हल-4 प्रयोगशाळेत झाली. या ठिकाणी ‘व्हायरस कवच’ फवारलेल्या कपडय़ांवर सार्स-कोव्ह-2 हा ‘कोविड-19’ साथीला जबाबदार असलेला विषाणू सुद्धा 99.99 टक्क्यांहून अधिक निक्रिय झाल्याचे आढळून आले.
विद्यापीठाच्या नॅनोसायन्स व तंत्रज्ञान विभागाचे मोलाचे संशोधन
शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागाने या संशोधनामध्ये महत्वाची भूमिका बजावली. केंद्राने पहिल्याच दणक्यात साऱया जगाची डोकेदुखी असणाया कोविड-19 या विषाणूला निक्रिय करणाया संयुगाची निर्मिती करून प्रभावी कामगिरी करून दाखविली आहे. ‘व्हायरस कवच’ संयुगाच्या संशोधनाने भारत सरकारच्या निती आयोगातर्फे घेण्यात आलेल्या अटल इनोव्हेशन मिशन या स्पर्धेत पहिल्या पाच अभिनव संशोधनांत स्थान मिळविले होते.
शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती देणारे संशोधनः कुलगुरू डॉ. करमळकर
कोरानावरील लसीचे संशोधन जगभरात सुरू आहे. शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स विभागाच्या संशोधकांनी ‘व्हायरस कवच’ या संयुगाची निर्मिती करून आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती दिली आहे. त्यांची कामगिरी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी काढले. कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, सार्स-कोव्ह-2 हा विषाणू एखाद्या पृष्ठभागावर सात सात दिवस राहू शकतो. इतका दीर्घकाळ टिकून राहण्याचा चिवटपणा असल्यामुळे त्याच्या स्पर्शातून संसर्गाची शक्यताही अधिक असते. यामध्ये आपल्या शरीरावरील कपडय़ांचा वाटाही मोठा असू शकतो. आज कोरोना विषाणूच्या सामाजिक संसर्गाची साखळी तोडणे हेच आपल्यासमोरील प्रमुख आव्हान आहे. या तंत्रज्ञानामुळे ती साखळी तोडण्याचे काम होणार आहे.








