प्रतिनिधी / कोल्हापूर
साळोखे पार्कमधील भारतनगरात कोरोना योद्धा म्हणून काम करतो. तुझ्यामुळे आम्हाला कोरोनाचा ससंर्ग होईल. या कारणावरुन कोरोना वॉर्डबॉयवर खूनी हल्ला करण्यात आला. वॉर्डबॉयच्या मदतीला धावलेल्या त्यांच्या भावावरही पाच जणाच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना शनिवारी घडली असून, यांची पोलिसात नोंद झाली आहे.
सागर सुनिल जगताप व महादेव सुनिल जगताप (दोघे रा. आझम शेख यांच्या दुकानासमोर, भारतनगर, साळोखे पार्क, कोल्हापूर) अशी या हल्यात जखमीची नावे आहेत. सागर हा वॉर्डबॉय म्हणून काम करीत आहे. या हल्यात हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्याच्यावर कणेरी मठावरील सिध्दगिरी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. महादेव जगताप यांची प्रकृती अधिक गंभीर बनली असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
या खूनी हल्याप्रकरणी अभिषेक अजय मछले, अनिकेत उर्फ मुरली अजय मछले, अजय उर्फ गदर सुरेश मछले, आतिश सुरेश मछले, मुकेश महेश भाट (सर्व रा. भारतनगर, साळोखे पार्क, कोल्हापूर) या पाच जणांविरोधी राजारामपूरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
जखमी सागर जगताप हा युवक महानगरपालिकेकडून शिवाजी विद्यापीठामध्ये सुरु केलेल्या कोरोना विलगीकरण केंद्रात वाँर्डबॉय म्हणून काम करीत आहे. तो शनिवारी रात्री कामावरुन घराकडे येत होता. त्यावेळी अभिषेक मछले, अनिकेत उर्फ मुरली मछले, अजय उर्फ गदर मछले, आतिश मछले, मुकेश मछले या पाच जणांच्या टोळीने आडविले. तु कोरोना वॉर्डात वॉर्डबॉय म्हणून काम करतो. तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल. या कारणावरुन त्याला शिवीगाळ करीत, लाकडी दांडक्याने मारहाण करु लागले. यांची माहिती त्याचा भाऊ महादेव जगताप याला समजताच, तो भावाच्या मदतीला धावला. त्याच्यावरही पाच जणाच्या टोळीने मारहाण केली. यामध्ये जगताप बंधू गंभीर जखमी झाले असून, राजारामपूरी पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा नोंद केला आहे.









