वार्ताहर / पाचगाव
पाचगावमध्ये दोन महिन्यातच कोरोना रुग्णांची संख्या दोनशेपेक्षा जास्त झाल्याने घर टू घर सर्वेक्षण करून नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेण्यात येणार आहे तसेच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पाचगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व शिक्षकांमार्फत पाचगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व घरांमधील नागरीकांचा सर्वे करण्यात येणार आहे व आजारी व्यक्तींवर वेळीच उपचार करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी कोणती काळजी घ्यावी यासंबंधीही जनजागृती करण्यात येत आहे.
पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, तहसीलदार शितल भामरे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी पाचगावमध्ये आढावा बैठक घेतली आणि त्यामध्ये कोरोना प्रतिबंधक उपायोजना करण्यासंबंधी विविध निर्णय घेण्यात आले. त्यानुसार पाचगाव मधील ग्रामस्थांच्या आरोग्याचा सर्वे करण्यात येणार आहे. पाचगावमध्ये बुधवारपर्यंत 217 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 138 रुग्ण बरे झाले आहेत तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.









