इचलकरंजी नगरपालिकेची अनास्था, जीवनमुक्ती संघटना झिजवत आहे पायऱ्या
राजेंद्र होळकर / इचलकरंजी
गतवर्षी संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. कोरोनामुळे मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठीही कोण पुढे येण्यास प्रत्येकजण घाबरत होते. या अशा कठीण काळात इचलकरंजी जीवनमुक्ती सेवा संस्थेने पुढे येत विविध जाती-धर्मांच्या १७० कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. हे अंत्यसंस्काराचे काम करीत असताना संस्थेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची शक्यता होती. याची दखल घेवून नगरपालिकेने अंत्यसंस्कार करतेवेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे साहित्य खरेदी करण्याविषयी प्रती मृतदेह पाच हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेतला. परंतु सुमारे १ लाखांचे सानुग्रह अनुदान नगरपालिकेने संस्थेला दिलेलेच नाही. याच अनुदानासाठी संस्थेचे संस्थापक अनिल घोडके गेले सहा महिने नगरपालिकेच्या पायऱ्या झिजवत आहेत.
जीवनमुक्ती संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची शक्यता होती असे असतानाही त्यांनी हे काम केले परंतु त्याच्या या कामाकडे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह पालिका पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे संस्थापक अनिल घोडके यांनी सांगितले.
| कोरोना रुग्णांची आकडेवारी शहरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ही ४ हजार १२० झाली आहे तर कोरोनामुक्त संख्या ३ हजार ८७१ इतकी आहे. सध्या शहरातील ५४ व्यक्ती उपचारात आहेत. तर १९५ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. |









