जि. प. कर्मचाऱ्यांच्या बैठकीत निर्णय, एक दिवसाच्या पगारातून करणार हेल्थफंडची तरतूद
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना विरोधातील लढाईत गावपातळीपासून रुग्णालये व कार्यालयातील कर्मचारी उत्तम प्रकारे काम करत आहेत. परंतु दुर्दैवाने काही कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना स्वतंत्ररित्या उपचार व्यवस्था करावी अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेकडील सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करुन जिल्हा स्तरावर हेल्थ फंड तयार करण्याचा निर्णय झाला. यामधून कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना वैद्यकिय उपचारासाठी लागणारी अर्थिक मदत करण्याचे निश्चित झाले. उपचाराअंती तो कर्मचारी बरा झाल्यानंतर त्यांनी विमा किंवा वैद्यकिय परताव्यामधून सदर रक्कम हेल्थ फंडमध्ये भरण्याबाबत सर्वानुमते निर्णय झाला.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली. जि.प. कर्मचाऱ्यांनी मे 2020 च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीकरीता दिले आहेत. पण भविष्यात कोरोनाबाधित जि.प.कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचाराची सोय व्हावी यासाठी `हेल्थ फंड’ची तरतूद करण्याचा निर्णय झाला. जे कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत, त्यांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हा स्तरावर संपर्क कक्ष स्थापन करण्याचे ठरले. त्यांना आवश्यक असणारी हॉस्पिटल सुविधा, औषधे पुरविण्याचा निर्णय झाला. जे कर्मचारी कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना आवश्यक काळजी घेण्याबाबत संघटनेने पाठपुरावा करणाचे निश्चित झाले. कोरोनाबाधित कर्मचारी व त्याच्या कुटूंबासाठी आवश्यक असणारी वैद्यकिय मदत (ऑक्सिजन बेड, रेमडिसिविर इंजेक्शन व इतर औषधे देणे, कोरोना डटीवर असताना संसर्ग होऊन मयत झालेल्या जि. प. कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणारे सानुग्रह अनुदान व त्याचे कुटुंब निवृत्ती वेतनाच्या प्रस्तावाची त्यांच्या कुटूंबियांकडून तात्काळ पूर्तता करुन घेणे, जि.प. कर्मचाऱ्यांचा सामुदायिक विमा एकत्रितपणे उतरवण्याचा निर्णय झाला.
यावेळी कर्मचारी संघटनेचे सचिन जाधव, महावीर सोळांकुरे, अजित मगदूम, ए.ए. दिंडे, एफ. एम. फरास, एन. के. कुंभार, सुधाकर कांबळे, गौतम कांबळे, कुमार कांबळे, अलताफ शेख, मेहबूब शेख, राहुल शेळके, अमर पाटील, ए.व्ही. कुरणे, प्राची लोटे, पी. पी. पाटणकर, ई.पी. जोशी आदी उपस्थित होते.









