2021-2022 चे शिलकी अंदाजपत्रक सादर कोल्हापूर दर्शनसह शटल सर्व्हिस, सीएनजीवरील बस सुरू करणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेचा परिवहन उपक्रम असलेल्या केएमटीचे 2021-2022 चे अंदाजपत्रक बुधवारी सादर करण्यात आले. 1 लाख 28 हजार 100 रूपये शिलकीच्या या अंदाजपत्रकात 71 कोटी 19 लाख 80 हजार 100 रूपये महसुली जमा दाखविण्यात आली असून महसुली खर्च 71 कोटी 18 लाख 52 हजार इतका दाखविण्यात आला. भांडवली जमा 10 कोटी 25 लाख 75 हजार रूपये इतकी तर भांडवली खर्च 9 कोटी 87 लाख 75 हजार रूपये असा आहे. या अंदाजपत्रकात महापालिकेकडून अर्थसहाय्य म्हणून महसुली खर्चासाठी 14 कोटी रूपयांची आणि भांडवली खर्चासाठी 50 लाख रूपयांची अशी 14 कोटी 50 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात नाविन्यपूर्ण योजनांवर भर देण्यात आला असून इंधन बचतीचेही प्रयत्न करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे आणि केएमटीची जबाबदारी असणारे सहाय्यक आयुक्त संदीप घारगे यांनी केएमटीच्या अंदाजपत्रकाची माहिती दिली. 2021-2022 च्या अंदाजपत्रकात केएमटीच्या ताफ्यातील 129 पैकी 100 बसेस दररोज मार्गस्थ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बसेसच्या तिकटी विक्रीतून मिळणाऱया उत्पन्नाबरोबर पे अँड पार्क, बसेसवरील जाहिरात आदी मार्गाने येणारे उत्पन्न महसुली जमेत धरण्यात आले आहे.









