प्रतिनिधी / कुरुंदवाड
गेल्या दोन दिवसापासून शिरोळ तालुक्यात व राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप घेतली असली तरी गेल्या 12 तासांमध्ये तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत एक फुटाने वाढ झाल्याने पूरस्थिती कायम राहिल्याने महापुराचे संकट नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत आहे. पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने नदीकाठच्या काही नागरी वस्तीत आणि गवताच्या कुरणात पुराचे पाणी शिरले आहे.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पाणीपातळी वाढल्याने पाण्याखाली गेले आहे. संथ गतीने पाणी वाढत असल्याने मागील वर्षी प्रमाणे महापूर येणार अशी भीती निर्माण झाल्याने अनेकांनी आपल्या घरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवले आहे.
पूरस्थितीवर शासनाचे नियंत्रण
शिरोळ तालुक्यातील व सीमा भागातील सध्याच्या पूरस्थिती बाबत बोरगाव ( कर्नाटक ) येथे कर्नाटकचे पाटबंधारेमंत्री रमेश जारकीहोळी पाटबंधारे विभागाचे पदाधिकारी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर व पाटबंधारे विभागाचे पदाधिकारी प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांची शनिवारी दुपारी संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये कर्नाटकातील अलमट्टी धरणामध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा 50 हजार क्युसेक्स ज्यादा पाणी विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज शनिवारी अलमट्टी धरणामध्ये एकूण 1 लाख 56 हजार क्यूसेक्स इतकी आवक होत असून अलमट्टी धरणातून पुढे 2 लाख 20 हजार क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. यामुळे रविवार पासून पुराचे पाणी ओसरण्याची शक्यता आहे.
Previous Articleघरगुती वीज बिल माफीसाठी 10 ऑगस्टला धरणे आंदोलन
Next Article हुपरी पंचक्रोशीत एकूण रुग्ण संख्या 458 वर








