कुरुंदवाड : प्रतिनिधी
कुरुंदवाड येथे शिवसेना शिरोळ तालुका प्रमुख वैभव उगळे यांच्या नावाने बॉम्ब सदृश्य वस्तूचे पार्सल आले होते. बॉम्ब शोध पथकाने या बॉम्ब सदृश्य वस्तूंची पाहणी करून निकामी केले. बॉम्ब असल्याची वार्ता शहरात पसरताच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ही वस्तू तबक उद्यान मैदानात अलगद आणून ठेवत बॉम्ब शोध पथकाने प्रक्रिया करून वस्तू निकामी केली. यामध्ये साधे घड्याळ व फटाक्यांची दारू आणि काही वायरींचे सर्किट मिळून आले. दोन दिवसापूर्वी जयसिंगपूर येथे बॉम्ब सदृश्य वस्तू मिळून आली होती. कुरुंदवाड येथे ही वस्तू पार्सलच्या माध्यमातून शहरात आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुरुंदवाड येथील महाडिक हॉटेल येथे शिरोळ तालुका शिवसेना तालुकाप्रमुख वैभव गुगळे यांच्या नावाने सांगली येथून रिक्षातून एका 70 वर्षीय वृद्ध माणसाने फुलांचा बुके व एक कागदी बॉक्स दिला. महाडिक हॉटेलच्या मालकाने तालुकाप्रमुख उगळे यांना आपले पार्सल आले आहे असे सांगितले. त्यांना पार्सल उघडून पहा असे सांगितले. पार्सल उघडून पाहिले असता बॉम्ब सदृश्य वस्तू दिसून आल्याने भयभीत झालेल्या हॉटेल मालकाने तालुकाप्रमुख उगळे यांनी सदरची माहिती सांगितली. यानंतर उगळे यांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटीलसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरची वस्तू अलगद उचलत तबक उद्यानच्या मैदानात आणून ठेवली. पार्सल घेऊन आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे.
बॉम्ब शोध पथक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मानसिंग पाटील,विनायक लाड, आशिष मिठारे,रवींद्र पाटील, ओंकार पाटील, जयंत पाटील, विनायक डोंगरे, मुस्तक शेख यांनी पार्सल वस्तूची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने सामग्री लावून सदरची वस्तू निकामी केली. या निकामी झालेल्या पार्सलमध्ये असणारे साहित्य तपासणीसाठी बॉम्ब शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.
पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी सदरची वस्तूही बॉम्ब सदृश्य होती मात्र बॉम्ब नव्हते, असे सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, संजय राठोड आदी उपस्थित होते.








