वार्ताहर / कुंभोज
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील आठवडी बाजार असणाऱ्या बुधवार, रविवारी दिवशीचा वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहतुकीच्या तासनतास होणाऱ्या ट्रॅफिकमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे.
परिणामी कुंभोज परिसरातील महिला वर्ग व बाजारपेठेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना मोठा त्रास होत असून नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बायपास रस्त्याचा प्रश्न येणाऱ्या पंधरा दिवसात लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत कुंभोज यांनी निकाली न काढल्यास कुंभोज शहर मनसे, मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा कुंभोज शहर मनसेचे अध्यक्ष प्रमोद सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
परिणामी जवळजवळ तेवीस हजार लोकसंख्या असणारे कुंभोज गावांमध्ये आठवड्यातून बुधवार व रविवार रोजी मोठा बाजार भरतो. सदर बाजार हा सकाळी ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतो. येथे एसटी स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक व बाजारपेठेसाठी येणाऱ्या लोकांमुळे प्रचंड गर्दी होत असते. परिणामी यावेळी कमी रुंदीच्या रस्त्यामुळे तसेच बाजारासाठी येणारे लोकांनी रस्त्यावर आपली वाहने पार्किंग केल्याने वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण होतो व त्यामुळे तासन्तास ट्राफिक जाम होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होते. याबाबत ग्रामपंचायत कुंभोज यांनी वेळोवेळी कठोर निर्णय घेऊन ही व्यापारी वर्ग व नागरिक अजूनही आपली वाहने रस्त्यावर पार्किंग करत असल्याने सदर रस्त्यावरून ऊस वाहतूक व अन्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.
याबाबत बायपास रस्त्याचे लवकरात लवकर नियोजन करून सरकार दरबारी बायपास रस्ताचा प्रश्न निकाली काढावा व लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांची खैरात न करता सदर बायपास रस्त्याच्या प्रश्नात जाणीवपूर्वक लक्ष देऊन ग्रामस्थांची मोठी समस्या मिटवावी अशी मागणी कुंभोज ग्रामस्थांच्यात जोर धरत आहे.









