पुण्याच्या वाचनप्रेमीकडून 137 पुस्तके भेट : वाचनालयाच्या ग्रंथ संपदेत भर
वार्ताहर / कुदनूर
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील विना अनुदानित ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाची पुण्यातून दखल घेण्यात आली असून, सुमारे 137 पुस्तके वाचनालयास प्राप्त झाली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पूणे वित्त विभागातून वरिष्ठ लेखापरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले मुकुंद भेलके यांना ज्ञानदीप वाचनालयाच्या वाटचालीची माहिती त्यांचे मित्र हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ वाचनालयास पुस्तके भेट देण्याचा निश्चय ठाम करत गणेशोत्सवाच्या काळामध्ये वाचकांसाठी दर्जेदार पुस्तकांचा खजिना देऊ केला आहे.
वाचनाची आवड असलेले भेलके यांनी ग्रामीण भागात अशाप्रकारच्या सुरू असलेल्या वाचनालयांची वाचन चळवळ वाढली पाहिजे या उद्देशाने अध्यात्मिक, चरित्रात्मक, कादंबऱ्या, कविता, कथा आदी प्रकारची अनेक दर्जेदार अशी पुस्तके वाचनालयास भेट दिली आहेत. त्यांनी दिलेल्या या पुस्तकी खजिन्यातून ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांच्या वाचनात नक्कीच भर पडणार आहे. कोणत्याही अनुदानाशिवाय सुरू असलेल्या या वाचनालयात नियमित वाचनासाठी चार वर्तमानपत्रे, सहा मासिके, एक साप्ताहिक उपलब्ध असून, अकराशे पुस्तके वाचनासाठी ठेवण्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षापासून व्याख्यानमाला, कथाकथन, काव्यवाचन, हस्ताक्षर, चित्रकला, निबंध आदी स्पर्धांचे आयोजन वाचनालयामार्फत केले जात आहे.

ज्ञानदीप उजळविण्यासह वाचन समृद्धी रुजविण्यासाठी हातभार
सन 1972 पासून बॉलपेन्स जमविण्याचा छंद जडला. त्यातून अगदी अर्धा इंच ते दोन फुटापर्यंत अशी 5000 बॉलपेन्स जमविली आहेत. याशिवाय वाचनाची अफाट आवड असल्यामुळे कालकुंद्रीतील वाचनालयाचे ज्ञानदीप उजळविण्यासह वाचन समृद्धी रुजविण्याच्या कार्यासाठी पुस्तके भेट देऊन छोटासा हातभार लावला. – मुकुंद एकनाथ भेलके, सेवानिवृत्त वरिष्ठ लेखापरीक्षक, पुणे









