गोकुळ शिरगाव / वार्ताहर (मालोजी पाटील)
कागल एमआयडीसा परिसरामध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. कामावर येणाऱ्या, जाणाऱ्या कामगारांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. शिवाय येथून एकटे जाणे हे सुद्धा आता कामगाराच्या जीवावर बेतणारे आहे. पोलिसांनी वेळीच या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे.
सायंकाळी ८ च्या सुमारास कामावर जाणाऱ्या येणाऱ्या परप्रांतीयांना अडवून चाकुचा धाक दाखवून मारहाण करत हे चोरटे त्यांच्याकडे मोबाईल आणि पैशांची मागणी करतात. २५ ते ३० वयाचे तीन लोक, कापडाने तोंड बांधलेले दोन लोक बिना नंबरच्या स्प्लेंडर किंवा पल्सर दुचाकीवरून येतात आणि लोकांना लुटतात अशी माहिती कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली. मेट्रो टेक्सटाईल पार्क ते लाडा फाउंड्री रोड ते तळंदगे गावामध्ये जाणारा शेता कडील रोड या भागांमध्ये मुख्यत्वे चोरट्यांचा वावर जास्त प्रमाणात दिसून येतो.
गेल्या पंधरवड्यामध्ये २५ हून अधिक चोरीचे प्रकार या भागात घडले असून हे नित्याचे झाले आहे असे इथले कर्मचारी सांगतात. सदर भागातून प्रवास करणाऱ्या लोकांनी सावध राहाव असे आवाहनही या ठिकाणच्या कामगार तसेच मालक लोकांनी केले आहे. या चोरीचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करून चोरांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत अशी मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे.
हुपरी पोलीस स्टेशन आणि गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनमधील संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन सहकार्य करावे अशी स्थानिक नागरिकांतून मागणी होत आहे.









