प्रतिनिधी / कोल्हापूर
बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी कलाशिक्षकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत चार वर्ष सक्तमजूरी, 25 हजार नुकसान भरपाई आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शितलकुमार बळवंत माने (वय 38 रा. मंगेशश्वर कॉलनी उचगांव ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.
कोल्हापूर शहरातील एका शाळेत शितलकुमार माने हा कलाशिक्षक म्हणून काम करत होता. पिडीत बालिकाही त्याच शाळेत शिक्षण घेत होती. शाळेत झालेल्या ओळखीमधून माने यांने संबंधित पिडीत बालिकेच्या घरातील मोबाईल क्रमांक मिळविला. मोबाईलवर अश्लिल संदेश पाठवून गैरवर्तन केले. त्याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर या खटल्याचे काम विशेष ज्यादा जिल्हा व सत्र न्यायाधिश ए. एस. महात्मे यांच्या न्यायालयात सुरु झाले. सरकार पक्षातर्पे ऍड. कुलकर्णी यांनी आठ साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने माने याला दोषी ठरवले. त्याला चार वर्ष सक्तमजूरी, 25 हजार रुपये नुकसान भरपाई, 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला ऍड. भारत शिंदे, ऍड. महेंद्र चव्हाण, तपासी अधिकारी संजय साळुंखे, सहाय्यक फौजदार शाम बुचडे, पैरवी अकारी अशोक शिंगे, माधवी घोडके यांचे सहकार्य मिळाले.









