दहा लाख ६७ हजारांचा माल जप्त
वार्ताहर / गोकुळ शिरगाव
पुणे-बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी येथे असलेल्या रेणुका लोकनाट्य कला केंद्रावर पोलिसांनी छापा मारून ३४ जणांवर कारवाई करून दहा लाख ६७ हजार रुपयाचा माल जप्त केला.
सोमवारी २४ रोजी मध्यरात्री “रेणुका लोकनाट्य कला केंद्र” या ठिकाणी गर्दी जमवून बाहेरून कुलूप घालून आत चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दी न जमण्याचे आदेश दिले असताना सुद्धा कणेरीवाडी येथील रेणुका लोकनाट्य कला केंद्र या ठिकाणी बाहेरून कुलूप लावून आत जवळपास ४० लोक एकत्र आल्याचे निदर्शनास आल्यानंतर संचारबंदी असताना सुद्धा एवढी गर्दी जमा केल्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने या कारवाईमध्ये क्यू.आर.टी पथक, कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाळे, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक गच्चे, महिला पोलीस उपनिरीक्षक पवार व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन यामध्ये ३४ लोकांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद नथुराम गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.









