खासगी डॉक्टर, औषध दुकानदारांना सुचना, कोरोना नियंत्रणासाठी माहिती न दिल्यास कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे, त्याच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने आता खासगी डॉक्टरांना संशयित रूग्णांची नोंद ठेवा, अशा सुचना दिल्या आहेत. तसेच मेडीकल स्टोअर्समधून रूग्णांना दिल्या जाणाऱया औषधांची नोंद संबंधितांनी ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. आपल्याकडे उपचारार्थ येणाऱया संशयित रूग्णांना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱयांनी दिल्या आहेत. दरम्यान, नोंदवही न ठेवणाऱयांवर फौजदारी कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांखाली आला आहे, जिल्हा तिसऱया टप्प्यात आला आहे. त्यामुळे दुपारी 4 वाजेपर्यत सर्व दुकाने खुली झाली आहेत. पण याचवेळी गर्दीमुळे संसर्गाचा धोकाही वाढला आहे. या पार्श्वभुमीवर कोरोनाची लक्षणे असलेल्या संशयित रूग्णांची माहिती आरोग्य विभागाला मिळावी, त्याद्वारे कोरोना संसर्ग टाळून, कॉन्ट्रक्ट टेसिंग वाढवणे शक्य होणार आहे. यादृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी खासगी डॉक्टर्स, औषध दुकानदार, व्यावसायिकांसाठी काही सुचनात्मक आदेश काढले आहेत.
जिल्ह्यात कॉन्ट्रक्ट ट्रेसिंगमध्ये वाढ झाली आहे, संशयित रूग्णांचा शोध सुरू आहे. त्यामुळे संशयित रूग्ण उपचारांसाठी आल्यास त्याची नोंद डॉक्टरांनी ठेवावी, संशयित रूग्णांना आरटीपीसीआर, अँटीजेन टेस्ट बंधनकारक करावी, असे निर्देश दिले आहेत. याशिवाय ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास असलेल्या संशयित रूग्णांनी स्थानिक औषध दुकानदारांकडून औषधे मागितल्यास त्यांच्याकडे प्रिस्क्रिप्शनची मागणी करावी, तसेच डॉक्टरांना भेटण्यास सांगावे, याच्या नोंदी आपल्या नोंदवहीत ठेवाव्यात, डॉक्टरांनी संशयित रूग्णांची नोंदवही ठेवावी, याची माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांना द्यावी, असे सुचित केले आहे.
माहिती न दिल्यास परवाना निलंबित : जिल्हाधिकारी
खासगी डॉक्टरांकडे येणारे संशयित रूग्ण अन् मेडीकल स्टोअर्समधून प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे नेणाऱ्यांची माहिती प्रशासनाकडून रोज घेतली जाणार आहे. त्यासाठी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. नोंदवहीमध्ये तारीख, रूग्णाचे नाव, पत्ता अन् मोबाईल क्रमाकांची नोंद डॉक्टर, औषध विक्रेत्यांना ठेवावी लागणार आहे. दरम्यान, याची माहिती न दिल्यास संबधितांचा परवाना रद्द करण्याची, फौजदारी कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे.









