सुमारे नऊ लाखांचे नुकसान
प्रतिनिधी / सरवडे
ऐनी ता. राधानगरी येथील आठ शेतकऱ्यांच्या घरवजा गोठ्यास आग लागून सुमारे नऊ लाखाचे आर्थिक नुकसान झाले. यामध्ये दोन म्हैशी आगीची झळ बसून किरकोळ जखमी झाल्या आहेत.आगीत शंकर भिवा बावकर,संदिप जोती पाटील, मारुती जोती पाटील, भिकाजी सखाराम पाटील, रंगराव सखाराम पाटील, बाबुराव सखाराम पाटील, सुखदेव हरी पाटील व संगीता पांडुरंग पाटील या शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे तीन वाजता अचानक प्रथम एका घराला आग लागली आणि बघताबघता या घरामध्ये गवत पिंजर, लाकडे, शेणी भरलेल्या असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण करुन इतर सात शेतकऱ्यांचा घराकडे ती पसरली.
सदरची आग ग्रामस्थांनी व बिद्री साखर कारखान्याच्या दोन अग्निशामक बंबानी चार तासाच्या अथक परिश्रमाने आटोक्यात आणली. नेमके आगीचे कारण समजले नसून या आगीत प्रापंचिक साहित्य व शेतीसाहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी आमदार प्रकाश आबिटकर, ए. वाय. पाटील, विजयसिंह मोरे, सरपंच शोभा आडसूळ, बळवंत पाटील, मारुती तोडकर यांनी पाहणी केली. तर मंडल अधिकारी शिवाजी कोळी, तलाठी प्रकाश गुरव, ग्रामसेवक दिपक पाटील, पोलिस पाटील विश्वास पाटील,कोतवाल दत्तात्रय देऊलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.