एसईबीसी आरक्षण स्थगितीनंतरचे चित्र ः वाढीव वयोमर्यादेचा लाभ गमावण्याची भीती ः परीक्षा स्थगितीच्या मागणीला वेग
संजीव खाडे / कोल्हापूर
मराठा आरक्षणाला (एसईबीसी आरक्षण) अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेला बसलेल्या लाखाहून अधिक मराठा विद्यार्थी, विद्यार्थिंनीचे भवितव्य टांगणीला लागले आहे. एसईबीसीतून गेल्या वर्षी परीक्षेसाठी अर्ज केला पण आता स्थगिती मिळाल्याने त्या आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याने पुढे काय होणार? या चिंतेत मराठा विद्यार्थी आहेत.
दरम्यान, लाखभर मराठा विद्यार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक जणांना एसईबीसी आरक्षणामुळे मिळणाऱया वाढीव वयोमर्यादेचे लाभ मिळणार नसल्याने एजबार व्हावे लागणार आहे. त्यांचे एमपीएससी पास होण्याचे स्वप्न संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा समाजातील रोष वाढत असून एमपीएससीसह इतर सर्व नोकरी भरती व परीक्षा स्थगित करण्याची मागणी वेग घेत आहे.
राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा येत्या 11 ऑक्टोबरला होणार आहे. राज्यभरातून तब्बल 2 लाख 75 हजार विद्यार्थी, विद्यार्थिंनी ही परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून अर्ज केलेले तब्बल एक लाखाहून अधिक मराठा विद्यार्थी, विद्यार्थिंनी आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला (एसईबीसी आरक्षण) अंतरिम स्थगिती दिल्याने एमपीएससीच्या परीक्षेला बसलेल्या लाखभर मराठा विद्यार्थी, विद्यार्थिंनी अडचणीत आल्या आहेत. परीक्षा दिली तरी एसईबीसीचे आरक्षण मिळणार नाही, परीक्षेचा निकाल कोणत्या प्रवर्गातून लागणार? याचे उत्तर राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाने दिलेले नाही, वाढीव वयोमर्यादेचा मिळणार लाभही जाणार, एजबारची चिंता अशा गर्तेत मराठा विद्यार्थी सापडले आहेत. एमपीएससी पास होण्यासाठी आयुष्यातील अनेक वर्ष अभ्यास करण्यासाठी घालवली आणि आता परीक्षा देत असताना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, यामुळे मराठा विद्यार्थ्यांमध्ये घालमेल वाढली आहे. त्यातून परीक्षा स्थगित करण्याची मागणी वेगाने पुढे येताना दिसत आहे.
पास होऊनही आणि परीक्षा देवूनही फायदा नाही
परीक्षेत पास झाल्यानंतर आरक्षणाच्या अभावी नियुक्ती मिळत नाही, परीक्षा दिली नाही तर रोजगार नाही, त्यामुळे भविष्यात काय करायचे? या कात्रीत मराठा युवक, युवती सापडल्या आहेत.
2019 च्या पीएसआयच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेलेही धोक्यात
2019 च्या पीएसआय पदाच्या मुलाखती अद्याप झालेल्या नाहीत. तारखेची घोषणा बाकी आहे. पण एसईबीसी आरक्षणातून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या मराठा युवक, युवतींचे काय होणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. त्याचबरोबर 2017 मध्ये पीएसआय परीक्षा पास झालेल्या 57 मराठा युवतींना अद्याप रूजू करण्यात आलेले नाही. त्यांनी न्यायालयात धाव घेत लढा सुरू ठेवला आहे.
एमपीएससी परीक्षा वयोमर्यादा अट (क्लास वनची पदे)
उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, गटविस्तार अधिकारी यासह वर्ग एकची इतर अधिकारी वर्गाच्या पदासाठी खुल्या वर्गासाठी 38 तर एसईबीसी 43 वर्षे वयोमर्यादा आहे.
एमपीएससी संयुक्त परीक्षा वयोमर्यादा अट (क्लास टूची पदे)
पद खुला गट एसईबीसी
पीएसआय 31 वर्षे 34 वर्षे
एसटीआय 38 वर्षे 43 वर्षे
असिस्टंट 38 वर्षे 43 वर्षे
………………………………………………………………………………………………..
कोट
पहिला आरक्षण मग परीक्षा
राज्य सरकारने 11 ऑक्टोबरच्या एमपीएससी परीक्षेसह इतर सर्व नोकर भरतीच्या परीक्षांना मराठÎांना आरक्षण मिळत नाही तो पर्यंत स्थगिती द्यावी. पहिला आरक्षण द्या मग परीक्षा घ्या.
-विशाल दिगंबर पाटील, कसबा बावडा, एमपीएससीचा विद्यार्थी.









