रस्त्यातच गावातील व्यक्तींकडून खड्डे मारण्याचा प्रकार
पाणंद रस्ता देखील अडविला. संबंधितावर कारवाईची मागणी
प्रतिनिधी / पन्हाळा, उञे
कासारी नदीच्या तिरावर वसलेल्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावातील मुख्य रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. येथील गावातील काही नागरिकांनी मनमानी करत मुख्य रस्त्यावर जेसीबीने मोठ-मोठे खड्डे मारुन रस्ता अडविला आहे. अशाच प्रकार गावातील पाणंद रस्त्यावर देखील सदरच्याच नागरिकांच्यावतीने करण्यात आल्याने सुमारे 500एकर शेतीकडे ये-जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांच्यातुन होत आहे.
उत्रे गावातील मुख्य रस्ता हा एक किमी अंतराच्या आसपास आहे.ग्रामपंचायतीच्या स्थापनेपुर्वीपासुन या रस्त्याचे असित्व आहे. गावातील मुख्य रस्ताच असल्याने रस्त्यावर वर्दळ असते. मात्र गावातील बाबासो तुकराम पाटील, गुंडा बाळु पाटील, महादेव तुकराम पाटील यांनी या मुख्य रस्त्यावर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जेसीबीच्या सहाय्याने तीन ठिकाणी जवळपास 12 फुट व्यासाचे खड्डे मारले आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद झाली असुन गावकऱ्यांचे यामुळे हाल होत आहेत. तसा अहवाल देखील पोलिस पाटील यांनी तहसिलकार्यालयाकडे पाठविला आहे.
त्याचप्रमाणे गावातील पश्चिम भागातील गायरान जागेतील साखळी पाणंद असणारा धंजी माळ येथील गट नंबर 133 मधील पुर्वीपासुन असलेला रस्ता दखील अडविण्यात आले आहे. सदरचा रस्त्याची नोंद ही नकाशात देखील आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन कायमपणे आजपर्यंत वहिवाट सुरु आहे. पण यावर्षी गट नंबर 133 चे मालक बाबुराव पाटील यांनी पाणंद रस्त्याच्या दोन्ही बाजुस कुंपण घालुन रस्ता बंद केला होता. यावर गावकऱ्यांनी आक्षेप घेत तहसिलदार रमेश शेंडगे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला होता. त्यानुसार याची तलाठी, पोलिस पाटील, मंडल अधिकारी यांनी पाहणी करुन सदरचे कुंपण काढुन वाट सुरु केली. तसेच पुन्हा हा रस्ता अडवु नये असे संबंधितीला सुनावले होते. पण शासकीय आदेशाची पायमल्ली करत आता या रस्त्यावर देखील जेसीबीने चर काढुन रस्ता बंद केला आहे.
सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरु आहे. सदरचा पाणंद रस्ता अडविण्यात आल्याने या भागातुन ऊस वाहतुक करता येत नसल्याने ऊस तोडणी बंद झाली आहे. आधीच अतिव्रुष्टी व पुराने शेतीचे नुकसान झाले आहे. त्यात वेळेवर ऊस तुटला नाहीतर आणखी नुकसान होण्याची भिती या भागातील शेतकरी वर्गाला लागुन राहिली आहे. तरी उत्रे गावातील मुख्य रस्ता व पाणंद रस्ता अडविणाऱ्यावर कडक कारवाई करावी, यागंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवुन हा प्रश्न तातडीन् सोडवावा अशी मागणी होत आहे.
उत्रे गावात सध्या मुख्य ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर व पाणंद रस्त्यावर खड्डे मारुन रस्ता बंद करण्याचा प्रकार संबंधिताकडुन करण्यात आला आहे. हा प्रकार कोणत्या आधारे करण्यात आला आहे. या संबंधिताना कोणाचे पाठबळ आहे, शासकीय नियमाला हारताळ फासत हा उद्योग का करण्यात आला आहे. याची सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा भविष्यात कोणीही सरकारी मालमत्तेत हस्तक्षेप करण्यास कुचराई करणार नाही.
सध्या गावातील मुख्य रस्ता आडविण्यात आल्याने वाहतुक बंद झाली आहे. तसेच पाणंद रस्ता देखील बंद झाल्याने शेतकऱ्याची अडचण झाली आहे. तरी या गंभीर प्रश्नाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवुन मुख्य रस्ता व पाणंद रस्ता खुला करुन गावकऱ्यांची गैरसोय दुर करावी
-प्रधान पाटील,(माजी सरपंच उत्रे)
सध्या अडविण्यात आलेला मुख्य रस्ता हा बाळु पाटील, गुंडा पाटील, बाबासो पाटील यांच्या गट नंबर 133 मध्ये येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या रस्त्यावर त्यांनी आपली जागा आहे म्हणुन खड्डे मारले आहेत. पण सदरचा रस्ता हा पुर्वीपासुन वहिवाटीचा आहे. या रस्त्यावर 1997 साली खडीकरण व डांबरीकरण देखील झाले आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर योग्य तो निर्णय द्यावा
-राजकुमार शिंदे (ग्रामसेवक,उत्रे)
आता रस्ता काम चालू होते. शासकीय निधी उपलब्ध आहे. पण संबंधित यांनी अडथळा निर्माण करून गावकरी यांना वेठीस धरले आहे. जिल्हाधिकारी यांनी याकडे तातडीने लक्ष घालून कार्यवाही करण्याची आग्रही मागणी शेतकरी व गावकरी यांनी केली आहे.