कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, उपचार सुरू असताना आज गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी एक पर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजत आहे.
2019 ला चंद्रकांत जाधव काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. जाधव यांचा कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशी फुटबॉललच्या माध्यमातून थेट संपर्क होता. तसेच जाधव इंडस्ट्रीजच्या माध्यमातून त्यांनी हजारो जणांना रोजगार दिला होता. तसेच आमदार जाधव यांनी राजकीय व सामाजिक कार्यातून मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. आमदार जाधव यांच्या निधनाबद्दल कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आमदार चंद्रकांत जाधव यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांना त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला होता. त्यावर स्थानिक रुग्णालयात एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना हैदराबाद मध्ये दाखल करण्यात आले होते.
उद्योजक म्हणून चंद्रकांत जाधव यांनी मोठे यश मिळवले होते. उद्योजकांचे प्रश्न सोडवणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. चंद्रकांत जाधव यांचे फुटबॉल खेळावर निस्सीम प्रेम होते. कोल्हापुरातील तालीम मंडळांचे ही ते हितचिंतक होते.
हैदराबादमधून त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजता पर्यंत काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आणण्यात येणार आहे. दुपारी १.०० ते १.३० वाजेपर्यंत काँग्रेस कमिटीत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सम्राटनगर येथील घरी पार्थिव नेण्यात येणार आहे. दुपारी १.३० ते ३.०० वाजेपर्यंत पार्थिव सम्राटनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
दुपारी तीन वाजता घरातून अंत्ययात्रा सुरू होईल. ती कोल्हापूर उद्यम सोसायटी, जाधव आयर्न वर्क्स, हुतात्मा पार्क, पीटीएम तालीम,
कैलासगडची स्वारी मंदिर, मंगळवार पेठेत येथील आमदार चंद्रकांत जाधव यांचे जनसंपर्क कार्यालय, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे पंचगंगा स्मशानभूमीकडे मार्गस्थ होईल.









