हॉटेल दौलतमधील बेकायदेशीर दारू विक्री साठ्यावर कारवाई
चुये/प्रतिनिधी
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीमध्ये कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील इस्पुर्ली ता. करवीर येथील हॉटेल दौलतमध्ये बेकायदेशीर दारू विक्रीच्या साठ्यावर पोलिसांनी छापा टाकून दारू साठा जप्त केला. याप्रकरणी हॉटेलचे व्यवस्थापक संजय बाळासो पाटील (रा. वडकशिवाले) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने सात दिवसाचा लॉकडाऊन केल्याने सर्वत्र दारूविक्री बंद आहे. या बंद काळात वाढीव दराने मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने दारू विक्री केली जाते. यातच हॉटेल दौलतमध्ये बेकायदेशीर दारूचा साठा असल्याची खबर पोलिसांना मिळताच कारवाई केली. यामध्ये सुमारे 71,974 इतक्या रकमेचा विविध प्रकारचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला.
पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर…
बेकायदेशीर दारूसाठा कारवाईचे ठिकाण हे इस्पुर्ली पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहे. जिल्ह्यात सर्वत्र कडक संचारबंदी असताना या पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावरती बेकायदेशीर दारूसाठा मिळाल्या मुळे याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
Previous Articleकोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 6 बळी, 269 पॉझिटिव्ह
Next Article सांगली जिल्हय़ात विक्रमी 106 रूग्ण वाढले








