मारहाणीची घेतली माहिती, व्यक्तिशः विचारपूस करून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले
प्रतिनिधी / कोल्हापूर
इचलकरंजी येथील महावितरण कार्यालय तोडफोड व मारहाण प्रकरणाची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून व्यक्तिशः विचारपूस करून मनोबल वाढविले.
इचलकरंजी महावितरण विभाग कार्यालय तोडफोड व कर्मचारी मारहाण प्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी में. हनुमान इंडस्ट्रीज मालक गजानन जाधव या औद्योगिक ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून १९ फेब्रुवारी २०२१ रोजी महावितरणच्या साजनी शाखा कार्यालय येथे गजानन जाधव, स्वप्नील जाधव, सचिन खाडे व इस्माईल पेंढारे यांनी महावितरण अधिकारी कर्मचारी यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महावितरणच्या इचलकरंजी विभागीय कार्यालयात गजानन जाधव सह इतर १५ ते २० जणांनी धुडगूस घालून दहशत निर्माण करीत कार्यालयाची तोडफोड करून अधिकारी व कर्मचारी यांना धक्काबुक्की व मारहाण केली.
महावितरणकडून संबंधिताविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्थानक, इचलकरंजी व पोलीस स्थानक हातकणंगले येथे स्वतंत्ररित्या गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. वारंवार विनंती, पाठपुरावा व आवाहन करूनही वीज बील न भरलेल्या ग्राहकांचा नियमानुसार सूचना देऊन वीज पुरवठा थकबाकी वसुलीसाठी खंडित करण्यात येत आहे.
दरम्यान, हनुमान इंडस्ट्रीज मालक जाधव यांना महावितरणकडून वारंवार थकीत वीज बिल सुलभ हप्त्याने भरण्याची विनंती केली होती. त्याबाबत त्यांना वीज पुरवठा भारतीय विद्युत कायदा २००३, कलम ५६(१) नुसार माहे नोव्हेंबर २०२० या महिन्याच्या ०७ डिसेंबर २०२० च्या देयकाची ७ लाख ६७ हजार २९२ रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी १५ दिवसाच्या मुदतीची पूर्वसूचना १२ जानेवारी २०२१ रोजी दिली होती. पण त्यांनी थकबाकी न भरल्यामुळे नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्यात आला. याचा राग मनात धरून गजानन जाधव, स्वप्नील जाधव, सचिन खाडे सह इतर १५ ते २० अनोळखी व्यक्तींनी महावितरण कार्यालयात येऊन लोखंडी रॉड, काठ्या, फावडे आदी हत्यारे व साहित्य वापरून कार्यालयात तोडफोड करून महावितरणचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान केले.
शासकीय कामात अडथळा, दहशत निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान व शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी महावितरणकडून शिवाजीनगर पोलीस स्थानक इचलकरंजी येथे दाखल केलेल्या फिर्यादीनूसार संबंधिताविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १४३,१४७, १४८, १४९ ,२७०,२७१, ३५३, ३३२, ३३७, ४५२, ४२७, ५०४, ५०६ , सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम ३ व ७, फौजदारी कायदा दुरुस्ती कलम ७ प्रमाणे तसेच साथरोग अधिनियम १८९७ चे कलम २,३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हातकणंगले पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार संबंधिताविरुद्ध भादवि कलम ३५३,३९२,३४२, ५०४,५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे कोरोना महामारीच्या काळात महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करून वीजपुरवठा सुरळीत ठेवला. अशा अप्रिय घटना घडणे निंदनीय आहे. ग्राहकांनी अपप्रवृत्तीना थारा न देता वीज बिल भरून सहकार्य करावे असे महावितरणतर्फे आवाहन करण्यात आले आहे. |