प्रतिनिधी/इचलकरंजी
येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे याने त्याला घंटागाडी चालकाकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी पेटवून घेतले. ही घटना नगरपालिकेच्या समोर घडली आहे. यामध्ये तो भाजून गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने पोलीस आणि नगरपालिकेच्या कर्मचार्यांमध्ये एकच धावपळ उडाली आहे.
गेल्या आठवड्यात शहापूर रस्त्यावरुन मेलेले डुकर घंटागाडीतून नेण्याऐवजी चक्क घंटागाडीला बांधून रस्त्यावरुन ओढून नेले जात होते. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या निदर्शनास आला. त्यानी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन, गाडीला मृत डुकर बांधून ओढत नेण्यास घंटागाडी चालकास अटकाव केला. त्यावरुन संबंधीत गाडीच्या चालकाने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. तसेच त्याच्यावर दहशत निर्माण करुन भोरे यांना चक्क मेलेले डुकर उचलून घंटागाडीत टाकण्यास भाग पाडले होते.
याप्रकरणी कचरा उठाव करणार्या संबंधीत ठेकेदार व ठेका घेतलेल्या कंपनीवर पेटा अॅनिमल कायद्यातंर्गत कारवाई करावी. शिवीगाळ करुन मारहाण करणार्या संबंधीत घंटागाडीच्या चालकावर कारवाई करावी. या मागणीसाठी त्याने सोमवार २६ ऑक्टोबर रोजी नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार भोरे यांनी सोमवारी दुपारी पेट्रोलची बाटली घेवून नगरपालिकेच्या इमारतीत प्रवेश केला. प्रवेश करताच त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. या प्रकाराने नगरपालिका आणि पोलिसांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यांच्या अंगाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला पण यात ते भाजून गंभीर झाले.
Previous Articleरत्नागिरी : खेड पंचायत समितीत ग्रामसेवकांना सतत बोलवू नका
Next Article तुम्ही जनतेचे सेवक, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही









