प्रतिनिधी / इचलकरंजी
शहरातील स्टेशन रोडवरील डेक्कन चौकालगतच्या एका हॉटेल समोर काल, शनिवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास गणेशनगरातील पोलीस रेकॉर्डवरील काणे गँगने एका युवकावर सशस्त्र हल्ला करुन निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव (वय ४५, रा. गणपती कट्टा, जवाहरनगर, इचलकरंजी ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरु केला असून, या घटनेची शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली आहे.
हा खून काणे गँगचा म्होरक्या शुभम काणे (मुळ रा. गणेशनगर, शहापूर, सध्या रा. जवाहरनगर, इचलकरंजी) आणि त्यांच्या चार ते पाच साथिदारांनी संगनमत करुन केला. काणे विरोधी शहापूर पोलिसात खूनाचा प्रयत्न, मारामारी असा स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंद आहे. हे सर्व संशयीत पसार झाले असून, शिवाजीनगर, शहापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे पथकाचे पोलीस शोध घेत आहे.
पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम काणे आणि मृत संतोष उर्फ पप्पू जाधव या दोघाच्यामध्ये गणेशोत्सवा दरम्यान किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. या वादातून या दोघामध्ये वैमस्य निर्माण झाले होते. शनिवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास संतोष उर्फ पप्पू जाधव शहरातील स्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल नेण्यासाठी आला होता. यावेळी गुन्हेगार काणेने आपल्या तीन ते चार साथिदाराच्या मदतीने त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. जखमीस उपचाराकरीता शहरातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती समजताच संतोष उर्फ पप्पू जाधव यांच्या नातेवाईकासह मित्रानी हॉस्पीटलमध्ये धाव घेतली. त्यांनी केलेल्या आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने जवाहरनगरातील गणपती कट्टा परिसरावर शोककळा पसरली आहे.
खुनाच्या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्यासह गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना घटनास्थळी रक्ताने माखलेली व मुठ तुटलेली एक तलवार मिळून आली. या तलवारीसह घटनास्थळावरील अन्य साहित्य पोलिसानी जप्त केले आहे.
Previous Articleइनोव्हा – कंटेनर अपघातात सात जखमी
Next Article …तरीही काश्मीरप्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही









