कारवाईच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
प्रतिनिधी/सांगरूळ
खाटांगळे (ता. करवीर ) येथील येथील आशा स्वयंसेविका मारहाणप्रकरणी एकास अटक झाली असून अद्याप तिघे फरार आहेत. दरम्यान आज करवीर तालुक्यात आशा स्वयंसेविका महिलांनी काम बंद आंदोलन पुकारले मुळे कोरोनाचे काम ठप्प झाले. पंचायत समितीच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेने आज आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे सांगितले.
आयुष मंत्रालयाकडून वाटप करण्यात येत असलेल्या आर्सेनिक अलबम या होमिओपॅथिक गोळ्यांची नियमापेक्षा जादा मागणी करत ज्यादा गोळ्या दिल्या नाहीत म्हणून करवीर तालुक्यातील खाटांगळे येथे रविवारी आशा वर्कर शोभा अशोक तळेकर यांना मारहाण केली होती. याबद्दल ग्रामपंचायत सदस्या वैशाली कृष्णात पाटील, कृष्णात बापू पाटील, पंडित बापू पाटील, एकनाथ ज्ञानू पाटील या चौघांच्या विरोधात करवीर पोलीस स्टेशन मध्ये रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. चौघापैकी एकनाथ ज्ञानू पाटील यांना करवीर पोलिसांनी अटक केली असून वैशाली कृष्णात पाटील ,कृष्णात बापू पाटील ,पंडित बापू पाटील हे तिघे फरार आहेत . पोलीस पथक त्यांचा शोध घेत असल्याचे करवीर पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान या घटनेने संतप्त झालेल्या करवीर तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविकेनी निदर्शने करत मारहान करणार्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू केले होते .यामुळे करवीर तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्गाचे सर्वेक्षण,महाआयुषचे कामकाज, लसीकरण, प्रसूती, डेंगू मलेरियाचे सर्वेक्षण, स्वच्छता मोहीम इत्यादी सर्व कामकाज ठप्प झाले होते. यामुळे करवीर तालुक्याच्या प्रशासनाने याची दखल घेत अशा स्वयंसेविका मारहाण प्रकरणातील दोषीवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन आशा व गटप्रवर्तक संघटनेला दिल्यानंतर आशा स्वयंसेविकाव गटप्रवर्तक संघटनेकडून काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे .
कोरोना विरुद्धच्या लढ्यात आशा स्वयंसेविका यांचे योगदान मोठे आहे .खाटांगळे येथील अशा स्वयंसेवीकेला झालेली मारहाण निषेधार्ह असून प्रशासनाकडून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देत आहे .आतापर्यंत केलेले काम चांगले आहे.सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे .याला प्रतिबंध करणे गरजेचे असून संघटनेने आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन करवीरचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी केले.
पोलीस प्रशासनाशी बोलून आशा स्वयंसेवी केला मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल .यापुढे अशा प्रकारचे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल .असे आश्वासन करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ .जी डी नलवडे यांनी दिले .
आशा स्वयंसेविकेवर झालेल्या अन्यायाची दखल प्रशासनाने घेतली असून आशा स्वयंसेविकेला मारहाण करणाऱ्या पैकी एकास अटक केली आहे तर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत .तसेच प्रशासनाने कारवाई करण्याचे लेखी आश्वासन आम्हाला दिलेले आहे . कोरोनाच्या या संकट काळात आमच्या कामाची जबाबदारी ओळखून आम्ही आंदोलन तात्पुरते स्थगित करून कामकाजात सक्रिय होत आहे .प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेवर ठाम रहावे . जर दोषीवर कारवाई नाही झाली तर पुन्हा आंदोलन सुरू करू .असे आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी सांगितले