प्रतिनिधी / कोल्हापूर
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी आणि आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. तरीही कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात वाढणारी रुग्णसंख्या, उपलब्ध आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनावर पडणारा ताण या बाबींचा गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. यासाठी मंगळवारी (14 जुलै) मी आणि पालकमंत्री सतेज पाटील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून लॉकडाऊन करायचे की नाही, याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात 160 रूग्णांची भर पडली असून आठवडय़ाभरात तीनशेहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. प्रशासनासह आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करत असतानाही समूह संसर्ग होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकाऱयांची बैठक होणार होती. या बैठकीत जिल्ह्यात लॉकडाऊन करायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार होता. पण दोन्ही मंत्र्यांना तत्काळ मुंबईला जावे लागल्यामुळे आणि लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी ही बैठक रद्द झाली.
याबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, मंगळवारी दूपारी पालकमंत्री सतेज पाटील आणि मी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन जिह्यात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करणार आहे. उपलब्ध आरोग्य यंत्रणा आणि रुग्णांचे प्रमाण पाहता कोरोनाचा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करायचे की नाही, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली नसल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
पंधरा दिवसांचे कडक लॉकडाऊन हवे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात रुग्णसंख्या कमी होती. पण ते शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. पण लॉकडाऊनच्या काळात सर्व समाजघटकांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा लॉकडाऊन केल्यास त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. तरीही प्रशासनाला 15 दिवसांचे लॉकडाऊन करायचे असेल तर ते कडक करावे. जेणेकरून कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल.








