सरनोबतवाडीतील घटना सुमारे दहा लाखाचे नुकसान
वार्ताहर / उचगाव
करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील पुणे-बेंगलोर महामार्गालगत असणाऱ्या ट्रक रिपेरी गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटने आयशर टेम्पोला आग लागून सुमारे दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सरनोबतवाडी येथे शामराव दत्तू माने यांचे श्रीगणेश ट्रक रिपेअर गॅरेज आहे. दुपारी बाराच्या सुमारास त्याठिकाणी कामाना विठोबा देवकाते रा. पसरिचानगर उजळाईवाडी यांचा ट्रक क्रमांक एम एच 09- 8204 बॉडी बिल्डिंगसाठी आणला होता. यावेळी शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे ट्रकचे दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले. तर गॅरेजमधील साहित्याचे नुकसान झाले.
यावेळी कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाचे उमेश जगताप, सुनील यादव अजित मळेकर, प्रमोद मोरे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. गांधीनगर पोलिस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. दुपारी साडेचारपर्यंत या घटनेची नोंद गांधीनगर पोलिसांत झालेली नव्हती.