ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही
प्रतिनिधी / इचलकरंजी
शहर व परिसरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या व मृत्यूदर चिंताजनक आहे. यासाठी शासनाच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय पूर्ण क्षमतेने ३०० बेड, सिटीस्कॅन मशीन बसविण्यात येणार असून येथील ऑक्सिजन टॅंक, पूर्ण क्षमतेने चालू करण्याबरोबरच हवेतील शुद्ध ऑक्सिजनच्या दोन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत शहर व परिसरातील कोरोना बाधितांना आयसीयू बेड व ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये व मृत्युदरामध्ये इचलकरंजी शहर चिंताजनक स्थितीत आहे. याची दखल घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी आयजीएम रुग्णालयास भेट देवून पाहणी केली. यावेळी उपस्थित वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीबाबत माहिती घेतली. त्यानंतर येथील प्रांत कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाच्या ताब्यात असणाऱ्या आयजीएम मधील त्रुटी तात्काळ दूर करून येथे येणाऱ्या रुग्णांना आयसीयू बेड व ऑक्सिजनची कमतरता भासू देणार नाही. यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक असून कंत्राटी पध्दतीने त्याची पूर्तता करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा चौपटीने वाढवला आहे. म्युकर मायकोसिस आजाराने बाधित रुग्णांना शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत उपचार केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, तहसीलदार प्रदीप उबाळे, अपर तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.