प्रतिनिधी / गारगोटी
गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले आठवडाभर प्रलंबित असलेल्या व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आमदार प्रकाश आबीटकर गटाचा निर्णय जाहीर झाला. पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार प्रकाश आबीटकर यांनी राजर्षी शाहू आघाडीला पाठींबा जाहीर केला.
गारगोटी येथे झालेल्या राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघातील आबीटकर गटाचा मेळावा पार पडला. मेळाव्यात गोकुळचे माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील, मारूतीराव जाधव, नंदकुमार ढेंगे, बी एस देसाई, सभापती कीर्ती देसाई प्रमुख उपस्थितीत होते.
आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, दुध उत्पादकांच्या भल्यासाठी आम्ही राजर्षी शाहू आघाडीला जाहीर पाठींबा देत असून पूर्ण ताकतीनिशी पॅनेलच्या विजयासाठी प्रयत्न करणार असून आघाडीचा विजय निश्चित आहे.
यावेळी खासदार संजय मंडलिक, पालकमंत्री सतेज पाटील, जाधव गुरूजी यांची भाषणे झाली. सुत्रसंचालन धनाजी खोत यांनी केले तर आभार विजयराव बलूगडे यांनी मानले.









