वार्ताहर / सुळे
पन्हाळा पश्चिम भागात शांतता प्रस्थापित करून गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी कळे पोलिस ठाण्याची निर्मिती झाली. यांचा मुख्य उद्देश होता या परिसरातील अवैध धंद्यांना चाप बसावा पण प्रत्यक्षात पाच वर्षात या परिसरातील हे अवैध धंदे कमी न होता वाढतच चालले आहेत. यामुळे कळे पोलिसच कशाला असा प्रश्न जनतेला पडला आहे.
या परिसरातील अनेक गावात सुरु असलेली अवैध दारूविक्री कळे पोलिसांना न रोखता आल्यामुळे या परिसरातील तरुण दारूच्या आहारी जाऊन त्यांची कुटुंबे उदध्वस्त होत आहेत. यामुळे पोलिसांच्या कोणत्या भुमिकेमुळे येथील माता-भगिणींचे अश्रु त्यांना दिसत दिसत नाहीत का? हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.
या परिसरात होत असलेल्या अवैध दारू विक्रीकडे पोलिस दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक ग्रामस्थांकडून त्यांच्या तक्रारी थेट एसपी ऑफिस पर्यंत पोहचत आहेत व त्यांच्या आदेशानुसार कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा या परिसरात वारंवार छापे टाकून कारवाई करत आहे. त्यांच्या कारवाईचे लोकांकडून कौतूक होत आहेच पण कळे पोलिसांना हे अवैध धंदे दिसत नाहीत का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
तीन महिन्यापूर्वी कळे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नागरी वस्तीत कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून तीन लाखांची विनापरवाना दारू जप्त केली होती. या प्रकरणाची पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी गंभीर दखल घेत कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवून कळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांची तडकातडफी बदली केली होती.
या घटनेतूनही कळे पोलिस कर्मचाऱ्यांनी काहीही बोध घेतला नव्हता. अवघ्या तीन महिन्यात परत नागरी वस्तीत कळे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चार दिवसा पूर्वी छापा टाकून सुमारे दहा लाख रुपयांची विनापरवाना दारू जप्त केली आहे. या घटनेने कळे पोलिसांची भांबेरी उडाली आहे . अशा घटनेमुळे कळे पोलिसांच्या कर्तव्य बाबत सर्वसामान्य जनतेतून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेची बाबत पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी याची गंभीर दखल घेतली असुन हे प्रकरण कळे पोलिस ठाण्यावर शेकणार का ? हे लवकरच स्पष्ट होईल.








