ठाणेवाडी : अवचितवाडी -ठाणेवाडी दरम्यान कोसळलेल्या दरडीमुळे बोळावी रस्ता मातीच्या ढिगार्यात लुप्त झाला आहे.
मुरगूड / वार्ताहर
मुरगुडपासून 5 कि.मी. अंतरावर असलेल्या अवचितवाडी – ठाणेवाडी दरम्यान 400 फूट लांबीची दरड तब्बल 250 ते 300 फूट खाली कोसळली. कोसळलेल्या दरडीमुळे बोळावी – मुरगूड मार्गावर प्रवास करणे धोक्याचे ठरले आहे.
कागल तालुक्यातील हिल स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरगुड – बोळावी रस्त्यावर मुरगुड पासून 5 कि.मी. अंतरावर अवचितवाडी-ठाणेवाडी दरम्यान म्हसोबाचा पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमडीआर 8-800 /49 या मार्गावर 300 फुट रुंद आणि 400 फुट लांब दरड 300 उंचीने सरकली. काल पहाटे 6 वा.च्या सुमारास ही दुर्घटना घडली. डोंगरावरील वैरण काढायला आलेल्या काही शेतकऱ्यांनी ही दुर्घटना बघितली. एकाच वेळी एवढा मोठा भाग डोंगरातून घसरल्याने या शेतकऱ्यांची भीतीने गाळण उडाली.
मुरगूडहून जा-ये करण्यासाठी बोळावी, बोळावीवाडी, ठाणेवाडी, पळशिवणे, अवचितवाडीचे ग्रामस्थ मोटरसायकल, बस, दुचाकी व चारचाकी अन्य वाहने या मार्गाचा वापर करतात. या मार्गावरून प्रवास करतात. दरड कोसळली या मार्गावर झालेल्या दलदलीतून प्रवास करताना अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत तातडीने दखल घेत रस्त्यावर आलेला दरडीचा काही भाग बाजूला करून दुचाकी वाहनांना ये-जा करण्याची सोय केली. तथापि अजूनही रस्त्यालगतच्या उंचवट्याचा भाग कोसळण्याची भीती असल्यामुळे तातडीने या ठिकाणी संरक्षक भिंत उभारल्यास वरून येणारा रस्ता व दरड वाचू शकेल. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने याची दखल घेऊन ही संरक्षक भिंत उभा करणे आवश्यक आहे. दरम्यान, उपकार्यकारी अभियंता शिंदे, अभियंता पाटील, मुरगूडचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. वरीष्ठांच्या आदेशाने दरड उपसण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याची माहिती कंत्राटदार विजयकुमार गणपती पाटील यांनी दिली.