प्रतिनिधी / अब्दुललाट
अब्दुल लाट मध्ये कचरा उठाव आंदोलनाला बेदखल केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कचरा गोळा करून ग्रामपंचायतीच्या दारातच ढीग लावला. अब्दुललाटमध्ये विविध भागात सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत जागृती करून ग्रामपंचायतीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू होता. तसेच याबाबत अनेक सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी विविध निवेदन आणि समक्ष सूचना केल्या होत्या.
मात्र, या गंभीर विषयाची दखल न घेता ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य आपल्याच विश्वात मशगुल आहेत. सत्ताधारी आणि विरोधक सहल प्रकारणासोबत अनेक भानगडीत तुझ्या गळा माझ्या गळा ही भूमिका पत्करून अर्थपूर्ण घडामोडीत व्यस्त आहेत. वास्तविक आरोग्य, पाणी स्वच्छता या मूलभूत कामांची विसर पडलेली ग्रामपंचायत म्हणून अब्दुल लाटची चर्चा होत आहे.
आज गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःच कचरा उठाव करण्याबाबत आवाहन करून कार्यकर्ते जमवले. कामाला सुरुवातही झाली मात्र जबाबदारी म्हणून सरपंच, उपसरपंच सदस्य अथवा ग्रामसेवक कुणीही या उपक्रमाकडे फिरकलेही नाहीत. उलट सगळ्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी आपले फोन बंद ठेवले होते. जमलेल्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला आम्ही सहकार्य करत असताना आम्हाला बेदखल करत असल्याचे लक्षात येताच कार्यकर्ते संतापले आणि गोळा केलेला कचरा नेऊन ग्रामपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ढीग मारला आणि मुर्दाड प्रशासना विरोधात घोषणा दिल्या.
आठवडाभरात गावातील कचरा हटवला नाही तर कचरा गोळा करून सरपंचाच्या दालनात आणि सगळ्या सदस्यांच्या दारात ढीग मारला जाईल असा इशारा दिला आहे. या आंदोलनात विधायक फौंडेशनचे मार्गदर्शक डॉ. दशरथ काळे, प्रा. संजय परीट, विधायक फौंडेशनचे प्रमुख ओमप्रकाश पाटील, नेताजी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शरद पाटील, विदयोदय परिवाराचे विनायक माळी, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पायगोंडा पाटील, शिवसेनेचे महावीर गाडवे, विधायकचे विज्ञान उपाध्ये, अनिल कुडाळकर, राकेश पाटील आदी कार्यकर्ते सामील झाले होते.