कोरोना पार्श्वभूमीवर कोहळा पंचमी साधेपणाने
निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत टेंबलाई मंदिरात कोहळा फोडण्याचा विधी
परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप
प्रतिनिधी / कोल्हापूर
नवरात्र उत्सवामधील पंचमीला प्रतिवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारी करवीर निवासिनी अंबाबाई आणि टेंबलाई देवीची भेट यंदा कोरोना पार्श्वभुमीवर साधेपणाने झाली. अंबाबाई आणि भवानी मंडपातील तुळजाभवानीची पालखी सजलेल्या वाहनातून टेंबलाई टेकडीवर दाखल झाल्या. अंबाबाई-टेंबलाईची भेट झाली. यानंतर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत कोहळा फोडण्याचा विधी झाला. तत्पुर्वी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते कोहळा पुजन झाले. कुमारीका निधी श्रीकांत गुरव या बालिकेने त्रिशुलाने कोहळा फोडला. कोहाळ पंचमीसाठी निवडक लोक उपस्थित असूनही कोहळा मिळविण्यासाठी काही काळ गोंधळ उडाला. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
कोरोना पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नवरात्र उत्सव यंदा भाविकांविनाच सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून नवरात्र उत्सवामधील सर्व विधी नियमितपणे सुरु आहेत. पंचमीला टेंबालाई मंदिरात होणाऱ्या कोहळा पंचमीला विशेष असे ऐतिहासिक महत्त्व आहे. प्रतिवर्षी हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने होतो. अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरुमहाराज यांची पालखी टेंबलाई भेटीसाठी टेकडीवर येतात. यावेळी पालखी मार्गावर रंगबेरंगी रांगोळ, फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी करत पालख्यांचे स्वागत चौकाचौकात केले जाते. मात्र यंदा पालखी थेट वाहनातून टेंबलाई टेकडीवर गेल्याने पालखी मार्गावरही शांतता होती.
अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी झाल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता अंबाबाईची पालखी मंदिराच्या पूर्व दरवाजातून बाहेर येऊन टेंबलाईच्या भेटीसाठी मार्गस्थ झाली. जुना राजवाड्यातील नगारखान्यापर्यंत पालखी पायघवृड्यावरून पायी नेण्यात आली. यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनात पालखी ठेवण्यात आली. पालखीसोबत चोपदार, रोशननाईक, हवालदार, देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्यासह समिती व श्रीपुजक मंडळ असा लवाजमा होता. त्याचबरोबर तुळजा भवानीच्या पादुका व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान केलेली पालखीही टेंबलाईच्या भेटीसाठी तुळजाभवानी मंदिरातून बाहेर पडली. सव्वा आकराच्या सुमारास तुळजाभवानीची आणि पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अंबाबाईची पालखी टेंबलाई टेकडीवर दाखल झाली. प्रथम अंबाबाई-टेंबलाईची भेट झाली. यानंतर कोहळा फोडण्याचा विधी झाला. कोल्हासून राक्षसाचे प्रतिक असलेल्या या कोहळÎाचे श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुजन झाले. यानतंर कुमारिका निधी गुरव हिने त्रिशुलाने प्रतिकात्मक कोहळा रुपी राक्षचा वध केला. या विधीनंतर कोहळÎाचा तुकडा मिळविण्यासाठी उपस्थितांमध्ये झुंबड उडाली.
कोहळा विधीची मूळ परंपरा
कोहळा विधीची मूळ परंपरा बाजूला राहून कोहळ्याचा तुकडा मिळाल्याने भरभराट होते, असा चुकीचा समज आहे. चुकीच्या समाजामुळे या विधीला हुल्लडबाजीचे स्वरुप प्राप्त होत आहे, असे अंबाबाई अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, हा कोहळा म्हणजे कोल्हासूर राक्षसाचे धड आहे. अंबाबाईने कोल्हासूर राक्षसाचा वध कसा केला हे या विधीतून दाखविले आहे. कोहळा म्हणजे राक्षसाचे शिर असल्याने तो घरी घेऊन जाण्याची चुकीची प्रथा प्रचलित झाली आहे. या कोहळ्याच्या पाच वाटण्या ठरलेल्या आहेत. अर्धा कोहळा हा टेंबलाई आणि अंबाबाईच्या हिस्स्याचा आहे. तर उर्वरीत अर्धा कोहळ्यामध्ये पाच वाटण्या आहेत. एक हिस्सा तुळजाभवानाली आणि उर्वरीत कोहळा हा अतृप्त प्रजेसाठी तीन दिशेला फेकने अशी मूळ परंपरा आहे. मात्र हि परंपरा बाजूला राहून कोहळा विधीला वेगळेच स्वरुप प्राप्त झाल्याची खंत मालेकर यांनी व्यक्त केली. याविधीबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचेही मालेकर यांनी सांगितले.









