उचगाव /वार्ताहर :
गांधीनगर (ता. करवीर) परिसरात भजन, कीर्तन, पूजापाठ आदि धार्मिक विधीनी भक्तीपूर्ण वातावरणात महाशिवरात्री साजरी झाली. निळकंठ महादेव मंदिरामध्ये कैलासमान सरोवरमधील शिवलिंगाप्रमाणे बर्फाचे शिवलिंग जीपी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी महाशिवरात्रीनिमित्त उभारले. ते लक्षवेधी ठरले. भाविकांनी गर्दी न करता कोरोनाबद्दलची सर्व ती दक्षता घेत या शिवलिंगाचे दर्शन घेतले.
जी पी ग्रुपच्या राजकुमार सचदेव, चंदरलाल सचदेव, माजी सरपंच राकेश उर्फ गुड्डू सचदेव, बिल्लू सचदेव यांनी बर्फाच्या शिवलिंगाची प्रतिकृती तयार केली. चंदरलाल सचदेव यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
म्हसोबा मंदिर, सिंधू मार्केट, शिरू चौक, साईबाबा मंदिर परिसर, गांधीपुतळा परिसर, सिंधी सेंट्रल पंचायतच्या मागील शिवमंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त पॅकेटमधून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रेल्वेस्टेशन परिसरातही महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.









