प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी महापुरासह नैसर्गिक आपत्तीची संकटे सुरूच आहेत. महापूर संथपणे ओसरत असताना राधानगरी धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. रविवारी सायंकाळी या धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली, नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा दिल्यामुळे महापुराचा धोका पुन्हा वाढला आहे. शेळोशी-अणदुर दरम्यान रस्ता खचला आहे. विशाळगड परिसरात जमीन खचली आहे. करंजफेण येथे दरड कोसळली आहे. नैसर्गिक आपत्तींची ही मालिका सुरू असताना तिसऱया दिवशीही राष्ट्रीय महामार्ग बंद राहिला. काही जिल्हा मार्ग सुरू झाल्याने जनजीवन पुर्वपदावर येतानाच पुराचा धोका वाढत आहे. मदतकार्य सुरू असताना विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सलग दुसऱया दिवशी अपवाद वगळता पावसाने उघडीप दिली. दिवसभरात रविवारी पंचगंगेची पाणी पातळी 51 फुटांपर्यत कमी झाली, तरीही जिल्हÎाच्या पुर्व भागात पुरग्रस्तांसाठी बचाव कार्य सुरू राहिले. महापूर संथपणे ओसरत असताना पुन्हा महापुराचा धोका वाढतो आहे. राधानगरी धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने रविवारी सायंकाळी धरणातून विसर्ग सुरू झाला. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यातून महापुराची धास्ती कायम आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील पुराचे पाणी अद्यापी कायम असल्याने राष्ट्रीय महामार्ग रविवारीही बंद राहिला. रविवारी दुपारी महामार्गावरील वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने चाचणी घेतली. पण महामार्गावर अद्यापी 8 फुटांइतके पाणी असल्याने रविवारी महामार्गावरील वाहतूक सुरू होऊ शकली नाही. काही जिल्हा मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे.
दोन ठिकाणी भुस्खलन, दरड कोसळण्याची घटना
शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड परिसरातील भोसलेवाडी येथे टेकडीचा काही भाग भूस्खलनाने खचला आहे. गगनबावडा तालुक्यातील अणदुर-धुंदवडे-शेळोशी मार्गावर भुस्खलनाने 1 किलोमीटर रस्ता खचला आहे. करंजफेण येथे दरड कोसळल्याने पेट्रोल पंपाचे नुकसान झाले आहे. पण जीवित हानी झाली नाही. दुधगंगा डावा कालवा माजगावनजीक खचला आहे.
राधानगरी धरणाच्या दोन दरवाजांतून विसर्ग सुरू
दरम्यान, राधानगरी धरणाच्या 6 स्वयंचलित दरवाजांपैकी दोन दरवाजांतून दुपारी 4 वाजता सुमारे सव्वाचार हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. धरणात 347.57 फुट पाणीसाठी आहे. धरण क्षेत्रात अद्यापी पाऊस सुरू असल्याने स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष
येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मेरे यांनी प्रमुख डॉक्टरांची बैठक घेतली. बैठकीत कोरोना आणि महापुरानंतर येणाऱया साथींवर चर्चा झाली. सीपीआर हॉस्पिटलमध्ये जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन रविवारी करण्यात आले.
नॉन कोरोना रूग्णांसाठी सीपीआरमध्ये लवकरच स्वतंत्र वॉर्ड
महापुरानंतर येणाऱया विविध साथींमुळे रूग्णांमध्ये वाढ होण्याचा धोका आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभुमीवर सीपीआर हॉस्पिटलमधील एक वॉर्ड नॉन कोरोना रूग्णांसाठी खुला ठेवावा, अशी मागणी आहे. यासंदर्भात सीपीआरमध्ये बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी झालेल्या बैठकीत नॉन कोरोना रूग्णांसाठी एक इमारत वेगळी ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
शहरात पाण्यासाठी धावाधाव, काही ठिकाणी वीजपुरवठा सुरू
महापालिकेचे पंपहाऊस पाण्याखाली गेल्याने तीन दिवसांपासून शहरात पाणी टंचाई आहे. महापालिकेने टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. नागरीकांनी कुपनलिका, विहिरीतील पाणी मिळण्यासाठी गर्दी केली. वॉटर एटीएम, टँकर तसेच कॅनसाठी रांगा लागल्या होत्या. काही भागात वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.
पेट्रोलसाठी पुन्हा रांगा, वादावादीचे प्रकार
जिल्हा प्रशासनाने पेट्रोल, डिझेल आरक्षित केले आहे. फक्त अत्यावश्यक सेवेला ते दिले जात आहे. पण नागरीकांनी दबावामुळे अधिकतर पंपांवर पेट्रोल दिले जात आहे. रविवारीही पेट्रोलसाठी पंपांवर रांगा लागल्या होत्या. शहरातील पेट्राल पंप दुपारनंतर बंद राहिल्याने वाहनधारकांनी महामार्गावरील पंपावर गर्दी केली. महामार्ग अद्यापी बंद असल्याने सोमवारीही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांनी पुरग्रस्तांची निवारा केंद्रे, जनावरांच्या चारा छावण्याची पाहणी केली. शिरोळ तालुक्याला पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट दिली.
Previous Articleमहापूरात बाधीत झालेल्या सर्वांनाच शासनाची मदतीसाठी नियोजन करा
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.