प्रतिनिधी / कोल्हापूर
कुस्तीपंढरी म्हणून ओळख असणाऱया कोल्हापूरच्या मल्लांना मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाने यंदा पुन्हा 19 व्या वर्षीही हुलकावणी दिली आहे. यापूर्वी विनोद चौगुलेने 2000 साली मानाचा किताब पटकविला होता. यानंतर सुमारे 19 ते 20 वर्षांचा कालावधी उलटला असून उपमहाराष्ट्र केसरीपर्यंत मजल मारण्यात यश मिळाले आहे. मात्र, मानाचा किताब महाराष्ट्र केसरी पटकविण्यात अपयशी ठरल्याने कुस्तीपंढरीचे गतवैभव मिळविण्याचे युवा मल्लांसमोर आव्हान आहे.
लक्ष ‘महाराष्ट्र केसरी’चे ठेवून युवा मल्लांचा कसून सराव
आगामी 2020-21 साली होणाऱया ‘महाराष्ट्र केसरी’ चे लक्ष ठेवूनच कोल्हापूर जिल्हयातील मल्लांनी त्यादृष्टीने आतापासूनच विविध तालमींमध्ये कसून सराव सुरू केला आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे पुढील वर्षात होणाऱया महाराष्ट्र केसरीचे मैदान कोल्हापूरातच व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेकडे पाठपुरावाही केला जात आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांची खंडीत झालेली परंपरा कोल्हापूरातील युवा मल्ल मोडीत काढतील आणि महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकवून गतवैभव प्राप्त करतील, असा विश्वास मोतीबाग तालमीचे वस्ताद उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने व प्रशिक्षक कृष्णात पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूरचा मल्ल ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा पहिला मानकरी
राजर्षी शाहूंच्या काळापासून कुस्ती पंढरी म्हणून कोल्हापूरचा नावलौकिक आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ या मानाच्या कुस्ती स्पर्धेतील पहिले अजिंक्यपद कोल्हापूरचा मल्ल दिनकरराव दहृयारी यांनी 1961 साली मिळविले होते. यानंतर सुमारे 16 वर्षे सर्वाधिक ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून अनोखा विक्रम प्रस्थापित करून कोल्हापूरच्या मल्लांनी निर्विवाद वर्चस्व राखले होते. 2000 साली विनोद चौगुलेने ‘महाराष्ट्र केसरी’चे अजिंक्यपद पटकविल्यानंतर सलग 19 वर्षे कोल्हापूरला अजिंक्यपदाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
डब्बल महाराष्ट्र केसरीचे चार मानकरी
कोल्हापूरातील मल्लांनी ‘डब्बल महाराष्ट्र केसरी’ चा बहुमान पटकविला आहे. यामध्ये 1964 व 65 गणपतराव खेडकर, 67 व 68 चंबा मुतनाळ, 70 व 71 दादू मामा चौगुले, 72 व 73 लक्ष्मण वडार आदींचा समावेश आहे. तसेच 2014 ते 16 असे सलग तीन वेळा जळगांवच्या विजय चौधरी तर 2011 ते 2013 या काळात सलग तीन वर्षे नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी जिंकत आले होते. गेल्या 7 वर्षात केवळ 3 महाराष्ट्र केसरी झाले असून यापैकी 3 वेळा ही स्पर्धा पुण्यात झाली असून एकदाच पुण्यातील मल्ला अभिजित कटकेला मानचा किताब पटकविला आहे.
1961 ते 2020 पर्यंतचे ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकविणारे मल्ल
1961 – पैलवान दिनकरराव दहृयारी (कोल्हापूर), 1962 भगवान मोरे, 63 स्पर्धा रद्द, 1964 व 65 गणपतराव खेडकर (कोल्हापूर), 66 दिनानाथ सिंह, 67 व 68 चंबा मुतनाळ (कोल्हापूर), 69 पैलवान हरिश्चंद्र बिराजदार, 70 व 71 दादू मामा चौगुले, 72 व 73 लक्ष्मण वडार (कोल्हापूर), 74 युवराज पाटील (कोल्हापूर), 75 रघुनाथ पवार, 76 हिरामणा बनकर, 77 अनिर्णित, 78 अप्पा कदम, 79 शिवाजीराव पाचपुते, 80 इस्माईल शेख, 81 बापू लोखंडे, 82 संभाजी पाटील (कोल्हापूर), 83 सरदार खुशहाल (कोल्हापूर), 84 नामदेव मोळे (कोल्हापूर), 85 विष्णुजी जोशीलकर (कोल्हापूर), 86 गुलाब बर्डे, 87 तानाजीराव बनकर, 88 रावसाहेब मगर, 89, 90 व 91 अनिर्णित, 92 अप्पालाल शेख, 93 उदयराज यादव (कोल्हापूर), 94 संजय दादा पाटील, 95 शिवाजी केकान, 96 स्पर्धा रद्द, 97 अशोक शिर्के, 98 गोरख सरक, 99 धनाजी फडतरे, 2000 विनोद चौगुले (कोल्हापूर), 2001 राहुल काळभोर, 02 मुन्नालाल शेख, 03 दत्ता गायकवाड, 04 चंद्रहास निमगिरे, 05 सइद चाऊस, 06 अमोल बुचडे, 07 व 08 चंद्रहार पाटील, 09 विकी बनकर, 10 समाधान घोडके, 11, 12 व 13 नरसिंह यादव, 14, 15 व 16 विजय चौधरी, 2017 अभिजित कटके. गतवर्षी डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बाला रफिक शेकने तर यंदाच्या स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सादगिरने लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करून मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकविला आहे.