प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात संचारबंदी लागू केली आहे. या काळात संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरी बसणे गरजेचे आहे. काही कारण नसताना रस्त्यावर येणाऱ्या वाहनधारकावर गुन्हे दाखल केल जात आहेत. मंगळवारी दिवसभरात अशा प्रकारचे ७६७ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून १ लाख ५३ हजार रुपये दंड वसुल केला आहे. या सोबतच दारुबंदी कायद्याअंतर्गत २ गुन्हे दाखल झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या संसर्गापासून नागरिकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने घरातच राहण्याच्या सुचना केल्या आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. शहरासह जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यामध्ये दिवसभरामध्ये ७६७ गुन्हे दाखल झाले. जुना राजवाडा पोलीस ठाणे ९, लक्ष्मीपुरी ६२, शाहूपुरी २७, करवीर २१, गांधीनगर १५, कागल २२, शिरोली एमआयडीसी २, इस्पुर्ली ५, शाहूवाडी ६, कोडोली ७, कळे ९, कुरुंदवाड ७, जयसिंगपूर ३०, शिरोळ ६, हातकणंगले २३, गडहिग्लज ६०, आजरा ३२, भुदरगड ९, नेसरी ६, कोल्हापूर शहर वाहतूक शाखा ४०६, इचलकरंजी वाहतूक शाखा ३ अशा प्रकारची कारवाई केली आहे.
दारु विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत २ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये मुरगूड पोलीसांनी अभिजीत चंदर डवरी (वय २४ रा. निढोरी ता. कागल) व राजारामपुरी पोलीसांनी मिथून उर्फ अण्णा मुंद गर्दे (३५ रा. राजारामपूरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
वाहने तपासणी
मंगळवारी दिवसभरात कोल्हापूर जिल्हयात ७७७० मालवाहतूक वाहनांनी प्रवेश केला. त्यापैकी २९९१ वाहने सीमेबाहेर गेली.पोलीसांकडून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.








