नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याबाबत तूर्तास कोणताही निर्णय झाला नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी जाहीर केले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, कोल्हापुरात कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र असा कोणताही निर्णय सध्या तरी घेण्यात येणार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा कडक लॉकडाऊनची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. सोशल मिडीयावर देखील कोल्हापुरात पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याची अफवा पसरली होती. मात्र सध्या तरी कोल्हापुरात कडक लॉकडाऊनचा विचार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जेवढे रुग्ण आढळून आलेत, त्यांच्यावर उत्तम प्रकारे उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याच प्रमाणही जिल्ह्यात चांगले आहे. लॉक डाऊन हा सर्वस्वी पर्याय नसला तरीही नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. कोरोना संदर्भात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले. त्यामुळे लॉककडाऊनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.









