प्रतिनिधी / कोल्हापूर
ज्येष्ठ कामगार नेते, कॉ. गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनी, शनिवारी, 20 रोजी सायंकाळी शाहू स्मारक येथे ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचे ऑनलाईन व्याख्यान तर दसरा चौकातील अभिवादन सभेत विद्यार्थी नेते डॉ. कन्हैय्या कुमार यांचे व्याख्यान होणार आहे. दसरा चौकातील सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत.
काँ. गोविंद पानसरे यांची 20 फेब्रुवारी 2015 रोजी हत्या झाली होती. त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला मॉर्निग वॉक उपक्रम राबवला जात आहे. कॉ. पानसरे यांचे विचार जपण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनी, शनिवारी, 20 रोजी सायंकाळी 7 वाजता दसरा चौकात अभिवादन सभा आयोजित केली आहे. ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन आणि ऑल इंडिया युथ फेडरेशनने त्याचे आयोजन केले आहे. सभेला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ कन्हैय्या कुमार, विद्यार्थी नेत्या डॉ. अमृता पाठक मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती गिरीश फोंडे यांनी दिली.
लक्ष्मीपुरीतील श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी सायंकाळी 6 वाजता शाहू स्मारक भवनात ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचे ऑनलाईन व्याख्यान होणार असल्याची माहिती कॉ. फोंडे यांनी दिली.









