प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात सलग पाचव्या दिवशी रविवारी महिला डॉक्टरसह आठ जण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्हमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. सोलापूर, पालघर आणि मुंबईतून ते आले होते. क्वॉरंटाईन काळात त्यांचे रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आले. दरम्यान, रेड झोनमधून येणाऱया प्रत्येकाचे प्रोटोकॉलनुसार स्वॅब घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी आलेल्या रिपोर्टमध्ये सोलापूर येथील 23 वर्षीय नवनियुक्त डॉक्टर आहे. काही दिवसांपुर्वी ती कोल्हापुरात सीपीआरमध्ये मुलाखतीला आली होती. तिची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने ती सीपीआरमध्ये 13 रोजी रूजू होण्यासाठी आली होती. मंगळवारी तिचा स्वॅब घेतला होता. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हय़ातील ही पहिलीच कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर असून तिला सोलापुरातच लागण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील 22 वर्षीय तरूण 15 रोजी मुंबईहून कोल्हापुरात आला. त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. आजरा येथील 49 वर्षीय व्यक्ती 13 रोजी मुंबईहून कोल्हापुरात आली. त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. भुदरगड येथील 32 वर्षीय तरूण 13 रोजी मुंबईहून आला आहे. या तिघांनाही इन्स्टिटय़ुशनल क्वॉरंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रविवारी सीपीआरमधील कोरेना वॉर्डमध्ये दाखल केले
दरम्यान, सायंकाळी आणखी चौघांचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील मोहरे येथील 26 वर्षीय तरूण पालघर येथून आला होता. तो कोरोंटाईन आहे. भुदरगड तालुक्यातील एरंडपे येथील 27 वषीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. तिच्यासोबत असलेले अन्य तिघेही पॉझिटिव्ह आले आहेत. ते सर्व सायन मुंबई येथून कोल्हापूर मार्गे गावी निघाले होते. तसेच गारगोटी येथील 8 वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह आला आहे. तोही मुंबईतून आला आहे. तसेच अंबरनाथ येथून आलेला 28 वर्षीय तरूण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील कडलगे येथील महिला पॉझिटिव्ह झाली आहे. तसेच पन्हाळा तालुक्यातील जाखले येथील तरूण पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या रविवारी 8 वर पोहोचली आहे. तर जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर पोहोचली आहे.
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा रविवारी संपत असताना याच काळात परजिल्हय़ातून आलेल्या कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. सोमवारपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होत आहे.








