प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या कारणावरून पालकमंत्री सतेज पाटील यांना लक्ष्य करत शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी कदमवाडीतील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल समोर शुक्रवारी (14 मे) उपोषण करण्याचा इशारा गुरूवारी दिला. त्यानंतर काँग्रेसही आक्रमक झाली आहे. इंगवले यांना आवरा अन्यथा आम्ही देखील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय कार्यालयासमोर शनिवारी (15 मे) उपोषण करू, असा प्रति इशारा काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी दिला आहे. त्यामुळे कोरोनावरून आता शहरात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
रविकिरण इंगवले यांचा इशारा
शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी गुरूवारी एक पत्रक काढत जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि मृत्युदराला पालकमंत्री सतेज पाटील जबाबदार असल्याचा आरोप केला. स्वतःच्या सोयीसाठी गोकुळ दूध संघाची निवडणूक लावणाऱया पालकमंत्र्यांनी कोरोना रोखण्यासाठी काय केले?, राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार नीलेश लंके स्वतःचे कोणतेही हॉस्पिटल नसताना एकहजार बेडचे कोरोना केअर सेंटर उभे करू शकतात. तर असे सेंटर कोल्हापुरात का उभारले जात नाही? असा सवालही इंगवले यांनी केला आहे. तसेच डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल समोर एक तासाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा प्रतिइशारा
मोठ्या व्यक्तीच्या विरोधात बोलले की आपले महत्व वाढते, आपल्याबद्दल चर्चा होते, असे समजून रवी इंगवले हे स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी गेली काही दिवस पालक मंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका करत आहे. शिवसेना नेत्यांनी इंगवले यांना आवर घालावा, अन्यथा 15 रोजी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय या कार्यालयाच्या दारात काँग्रेसच्यावतीने उपोषण केले जाईल, असा इशारा माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी गटनेते शारंगधर देशमुख, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी दिला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की ः टीकेमुळे आपण फार मोठे आहोत असा इंगवलेंना भ्रम झाला आहे. त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे हे समजण्याइतकी कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. कोरोना सारख्या महामारीमध्ये रात्र दिवस सतर्क राहून पालक मंत्री सतेज पाटील काम करत आहेत. लस पुरवठा आणि रेमडेसिव्हर यावर केंद्राचे नियंत्रण आहे. बेल्लारी मधून होणारा ऑक्सीजन पुरवठा बंद केला गेला तरी पालकमंत्री पाटील यांनी तत्काळ यावर उपाययोजना केली आहे. जिह्यात बाहेरील सांगली, सातारा, रत्नागिरी येथून सुद्धा अनेक रुग्ण उपचाराला येत आहेत. ही वस्तुस्थिती असताना इंगवले बालिश कारणे सांगत पालकमंत्री पाटील यांच्यावर आरोप करत आहेत.
उपोषण करायचे असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात करा
इंगवले महाशयांना कोरोनाबाबत उपोषण करावयाचे असेल तर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात करावे. डी वाय पाटील हॉस्पिटलच्या दारात ते उपोषण का करत आहेत?, असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसच्या माजी नगसेवकांनी उपोषणाचा निर्णय इंगवले यांनी मागे घेतला नाही तर जशास तसे उद्या उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या नेत्यांना दिला आहे
Previous Articleपन्हाळगडावर कोरोनामुळे शिवजयंती साधेपणाने
Next Article सकाळ-संध्याकाळ रंग बदलणारा पर्वत









