प्रतिनिधी / कोल्हापूर
शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारपासून कोरोना तपासणी लॅब सुरू होत आहे. या लॅबमधील अमेरिकन बनावटीच्या जीन एक्सपर्ट सीबीनॅट मशिनवर दीड तासाला 16 स्वॅबची तपासणी होणार आहे. हायरिस्क रूग्णांचे स्वॅब तपासले जाणार आहेत. 1 कोटीच्या या मशिनवर स्वाईन फ्लूसह अन्य तपासण्याही येंथे होणार आहेत. दुसरी लॅबही पाच दिवसांत सुरू होणार आहे. गुरूवारी कोरोना तपासणी लॅबची पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाहणी केली.
शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात कोव्हिड-19 तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. तेथे गुरूवारी स्वॅब तपासणीची चाचणी घेण्यात आली. शुक्रवार पासून लॅब कार्यान्वित होत आहे. चाचणीवेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. स्मिता देशपांडे उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लॅब सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लॅबची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याला आयसीएमआरने मान्यता दिली आहे. त्यामुळे जिह्यामध्ये घेतल्या जाणाऱया स्वॅबची तपासणी या प्रयोगशाळेत होईल. डीपीडीसीच्या माध्यमातून लॅबसाठी निधी दिला आहे. लॅबसाठी कार्टेज जास्तीत जास्त कशा मिळतील, त्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत. या सीबीनॅट मशिनची किंमत 98 लाख रूपये आहे. 45 मिनिटांत तब्बल 16 टेस्ट होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
सर्व अहवाल निगेटिव्ह यावेत ः पालकमंत्री
जिह्यात कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून शेंडा पार्क येथे लॅब कार्यान्वित केली आहे. या प्रयोगशाळेत तपासणी होणाऱया स्वॅबचे सर्व अहवाल निगेटिव्ह यावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली.
पहिली लॅब आज सुरू, स्वॅबचे रिपोर्ट लवकर मिळण्यास मदत
सीपीआरमध्ये ‘कोविड-19’ प्रयोगशाळा सुरु झाली आहे. या लॅबमध्ये लागणारी उपकरणे सूक्ष्मजीवशास्त्र विभागात कार्यान्वित केली आहेत. येथे कोरोना स्वॅब रिपोर्ट तपासणीला शुक्रवारी सुरूवात होणार आहे. रिपोर्ट लवकर उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.
दुसरी लॅब पाच दिवसांनी सुरू
शेंडा पार्क येथील सीबीनॅट लॅब शुक्रवारपासून सुरू होत आहे. याच इमारतीतील दुसरी लॅब उभारणी सुरू आहे. ती अंतीम टप्प्यात आहे. पाच दिवसांत ती सुरू होईल, अशी माहिती डॉ. स्मिता देशपांडे यांनी दिली.
सी.बी.नॅट जीन एक्सपर्ट मशिन फॉर कोव्हिड-19
13 रोजी जिल्हाधिकाऱयांची मशिन खरेदीसाठी अंतिम मंजुरी
15 एप्रिल रोजी कंपनीस रक्कम ट्रान्सफर.
18 एप्रिल सीबीनॅट मशिन कोल्हापुरात
20 एप्रिल इंस्टॉलेशन आणि तंत्रज्ञांचे प्रशिक्षण पूर्ण
21 एप्रिल रोजी कार्टेज प्राप्त.
23 एप्रिल रोजी आयसीएमआरची मंजुरी आणि कार्यान्वित.
दर दिवशी 340 तपासणीची क्षमता.








