प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनानंतर अर्थचक्र गती घेत असताना शहरात चेन स्नॅचिंग, चोऱया, घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारामारी, वादाच्या घटना घडत आहेत. वाढदिवस साजरे करण्यावरून वाद होत आहेत. गुंडगिरी पुन्हा डोके वर काढत आहेत. त्यामुळे आगामी काळात महापालिकेची निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात व्हावी यासाठी पोलीस खात्याने शहरातील हद्दपार गुंडांची यादी जनतेपुढे जाहीर करावी, अशी मागणी बी वॉर्ड अन्याय निवारण समितीने केली आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना निवेदनही देण्यात आल्याची माहिती समितीचे संस्थापक किसनराव कल्याणकर आणि अध्यक्ष रामेश्वर पत्की यांनी दिली.
कल्याणकर आणि पत्की यांनी सांगितले, शहरात चोऱया, घरफोड्यांबरोबर दहशत माजवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत आहेत. फाळफूटदादा आणि रेकॉर्डवरील फरार गुंड शहरात मोकाटपणे फिरत आहेत. त्यांच्याकडून दहशत माजविण्याचे प्रकार घडत आहेत. डिजिटल पोस्टरच्या माध्यमातून गुंड प्रवृत्तीचे लोक झळकत आहेत. आपले वाढदिवस साजरे करून ते महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या गंभीर प्रकाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने हद्दपार करण्यात आलेल्या, रेकॉर्डवरील गुंडांची नावे जनतेपुढे जाहीर करावीत. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे किसनराव कल्याणकर आणि रामेश्वर पत्की यांनी सांगितले.
Previous Articleरामपूर येथे दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू
Next Article कोल्हापूर-कागल-बेळगाव रेल्वे ट्रॅक









