कोल्हापूर \ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या कोल्हापूर इथून मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होत आहे. . संभाजीराजे छत्रपती यांच्या आवाहनाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसाद दिला आहे. उद्याच्या कोल्हापुरातील मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून याविषयी माहिती देण्यात आली आहे.
उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत, असे ट्वीट वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणा मुद्दयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर उद्या आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. यासोबतच उद्या होणाऱ्या आंदोलनात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील तसंच हसन मुश्रीफ हेही सहभागी होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मूक आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त खासदार संभाजीराजे यांनी समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन हे आंदोलन करण्यात यावं असंही त्यांनी समाजाला सांगितलं आहे.