एएनएमसह दोघेजण निलंबित : वैद्यकीय अधिकाऱयालाही नोटीस, चौकशी सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
लसीकरणानंतर रामदुर्ग तालुक्मयातील तीन मुलांचा गूढ मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली असून लसीचे कोल्डचेन ब्रेक झाल्यामुळेच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. सोमवारी यासंबंधी एएनएम व औषध वितरकाला निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱयाला नोटीस बजाविण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. सालहळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एएनएम सलमा महात, औषध वितरक जयराज कुंभार यांना निलंबित करण्यात आले असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्याधिकाऱयांना नोटीस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या फ्रीजमध्ये न ठेवता हॉटेलच्या फ्रीजमध्ये लस ठेवल्यामुळे चेनब्रेक होऊन ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
लसीकरणासाठी सरकारने ठरवून दिलेल्या मार्गसूचींचे उल्लंघन केल्यामुळेच ही घटना घडल्याची माहिती मिळाली असून या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने चौकशी तीव्र केली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनीही यासंबंधी पत्रकारांना माहिती दिली आहे. जिल्हा आरोग्याधिकाऱयांनी एकंदर घटनेसंबंधीचा प्राथमिक अहवाल आरोग्यमंत्र्यांना पाठविला आहे.
रामदुर्ग तालुक्मयातील बोचबाळ व मल्लापूर येथे लस घेतलेल्या तीन मुलांचा गूढ मृत्यू झाला आहे. लहान मुलांच्या आरोग्य रक्षणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली जाते. ही लसच तीन मुलांना विष ठरली आहे. बोचबाळ येथील 13 महिन्यांची पवित्रा, 14 महिन्यांचा मधू व मल्लापूर येथील 14 महिन्यांचा चेतन यांचा मृत्यू झाला आहे.
15 महिन्यांची नंदिनी ही अत्यवस्थ असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. डॉ. ईश्वर गडाद यांनी एकूण घटनेसंबंधी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्याधिकाऱयांना अहवाल दिला आहे.
उपलब्ध माहितीनुसार 10 जानेवारी रोजी जयराज कुंभार यांच्याकडून सलमा महात यांनी एक लस घेतली. लहान मुलांना देऊन बाटलीत उरलेली लस आरोग्य विभागाच्या फ्रीजमध्ये ठेवायला हवी होती. मात्र या एएनएमने ही बाटली एका हॉटेलमधील फ्रिजमध्ये ठेवली.
11 जानेवारी रोजी मल्लापूर येथे चेतन या मुलाला लस देण्यात आली. त्याचदिवशी चेतनचा मृत्यू झाला. लसीमुळे लहान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती होऊनही सलमा यांनी 12 जानेवारी रोजी 21 मुलांना त्याच बाटलीतील लस दिली. त्यापैकी चार मुले अस्वस्थ झाली. चारपैकी दोघा जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोग्य विभागाचे वरि÷ अधिकारी डॉ. सिद्धलिंगय्या व डॉ. प्रभू बिरादार यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनीही मागविला अहवाल : रामदुर्ग तालुक्यातील घटनेची गंभीर दखल
आरोग्य विभागातील कर्मचाऱयांच्या हलगर्जीपणामुळे रामदुर्ग तालुक्मयातील तीन मुलांचा लसीकरणानंतर मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकाऱयांकडून त्यांनी अहवाल मागविला आहे.
सोमवारी यासंबंधी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून संपूर्ण घटनेसंबंधी सविस्तर अहवाल देण्याची सूचना केली आहे. मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या मोबाईल संभाषणानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे.
आरोग्य विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत लसीचे कोल्डचेन तुटल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांनीही जिल्हा आरोग्याधिकाऱयांशी संपर्क साधून अहवाल मागितला होता. आता मुख्यमंत्र्यांनीही या घटनेसंबंधी जिल्हाधिकाऱयांकडून अहवाल मागविला आहे. आरोग्य विभागातील आणखी काही जणांवर कारवाई होणार आहे.









